आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ नागरिकाच्या सतर्कतेने सापडले 14 हजार अन् चोरटा, एसटीमध्ये प्रवाशानेच मारला होता डल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्यासमोर पैसे मोजून घेताना दयानंद बिरहारी. - Divya Marathi
पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्यासमोर पैसे मोजून घेताना दयानंद बिरहारी.
जळगाव - जळगाव बसस्थानकामध्ये जळगाव-जामनेर या बसमध्ये चढताना गुरुवारी सकाळी ११.३० वाजता नेरी दिगरच्या ज्येष्ठ नागरिकाच्या खिशातून १४ हजार रुपये चोरट्याने लांबवले. बसमध्ये चढल्यानंतर हा प्रकार लक्षात येताच ज्येष्ठ नागरिकाने सतर्कता दाखवली आणि चालकाला सांगून प्रवाशांसह बस थेट जिल्हापेठ पोलिस ठाण्याकडे वळवली. तेथे पोलिसांनी सर्व प्रवाशांची तपासणी केल्यानंतर संशयित प्रवाशाच्या बॅगमध्ये चोरलेले १४ हजार रुपये आढळून आले. पोलिसांनी पैसे त्यांना परत करून चोरट्याला ताब्यात घेतले. 
 
नेरी दिगर (ता.जामनेर) येथील आरोग्य विभागातील सेवानिवृत्त दयानंद आनंदराव बिरहारी (वय ८०) हे कामानिमित्त जळगावला आले होते. सकाळी त्यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरील बँक आॅफ महाराष्ट्रमधून १४ हजार रुपये काढले होते. ते पैसे रुमालात बांधून त्यांनी खिशात ठेवले. त्यानंतर ते नेरी बसस्थानकावर आले. जळगाव-जामनेर बस लागलेली होती. दरम्यान, सकाळी ११.३० वाजता एसटीमध्ये चढत असताना कुणीतरी त्यांची पॅन्ट ओढत होता. बसमध्ये चढल्यानंतर खिशातून पैसे चोरीला गेल्याचे लक्षात आले. 
 
बसमध्ये ४० ते ५० प्रवासी होते. जिल्हापेठ पोलिसांनी बसमधील प्रवाशांची तपासणी केली. मात्र कुणाजवळ पैसे आढळून आले नाहीत. पैसे चोरल्याबाबत कुणावर संशय आहे काय, अशी विचारणा पोलिसांनी त्यांना केली. त्यावर बिरहारी यांनी बसमध्ये चढत असताना एक व्यक्ती माझी पॅन्ट ओढत होता. हाच तो असे म्हणून एका प्रवाशाकडे अंगुली निर्देश केला. पोलिसांनी त्याला विचारणा केली असता त्याने नकार दिला. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याच्या बॅगमध्ये चोरलेले १४ हजार रूपये आढळून आले. पोलिसांनी बिरहारी यांचे पैसे परत केले. त्यानंतर इतर प्रवाशांसह बस पोलिस ठाण्यातून निघून गेली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चोरट्याने नाव विनोद धोंडीराम चव्हाण (रा. नशिराबाद, ता.सिंदखेडराजा) आहे. त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
गडबड गोंधळ, आरडाओरड करता सावध घेतला पवित्रा 
बिरहारी यांनी बसमध्ये १४ हजार रुपये चोरीला गेल्यानंतर गडबड गोंधळ, आरडाओरड केली नाही. सावध पवित्रा घेत तातडीने चालकाला माझे पैसे चोरीला गेले आहेत. बस पोलिस ठाण्यात घ्या, असे सांगून वाहकाला दरवाजा बंद करण्यास सांगितले. त्यामुळे चोरट्याला बसमधून बाहेर पडता आले नाही. सर्व प्रवाशांसह बस जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आणण्यात आली. 
बातम्या आणखी आहेत...