आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘या वर्षी एकच निर्धार, आयुष्यात नको कधी क्षयाचा आजार’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - हल्लीचे युग गतिमान असले तरी वेगवेगळे आजारही तेवढय़ाच वेगाने वाढत आहे. त्याचबरोबर जुन्या आजारांचा धोकाही वाढत चालला आहे. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी 24 मार्च रोजी ‘जागतिक क्षयरोग दिन’ साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त जनजागृतीवर विशेष भर देऊन क्षयरोगमुक्त समाज निर्माण करण्याचा प्रयत्न राहणार आहे.

‘या वर्षी एकच निर्धार, आयुष्यात नको क्षयाचा आजार’ हे घोषवाक्य ठरवण्यात आल्याची माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सुशील वाक्चौरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंद मोरे उपस्थित होते. सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात सर्वांचे तब्येतीकडे दुर्लक्ष होत असते. त्यामुळे पूर्वीपेक्षा आता क्षयरोगाचा धोका वाढत चालला आहे. त्यामुळे 24 मार्च हा दिवस ‘जागतिक क्षयरोग दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. 1882मध्ये या दिवशी डॉ.रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाचे विषाणू शोधले. त्यामुळे हा दिवस ‘क्षयरोग दिन’ म्हणून साजरा करण्यात येत असतो. यंदा यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डॉ.वाक्चौरे यांनी दिली. त्यानुसार शिरपूर येथे जनजागृतीपर कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, जिल्हाधिकारी प्रकाश महाजन, आरोग्य अधिकारी डॉ.अरविंद मोरे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

एमडीआर टीबीचा वाढता धोका..

क्षयरोगाची लागण झाल्यानंतर रुग्णास डॉट्स उपचार दिला जातो; मात्र डॉट्सचे अपूर्ण आणि अनियमित उपचार घेतल्यास एमडीआर टीबी होऊ शकतो. त्यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण अधिक असते. वर्षभरात जिल्ह्यात एकूण 90 रुग्णांचे एमडीआर टीबीचे नमुने घेण्यात आले. त्यापैकी 26 जणांना एमडीआर झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर उपचार सुरू करण्याआधीच दोन रुग्ण दगावले, तर उपचार सुरू झाल्यानंतर तीन रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच उपचाराचा थोडा अवधी उलटल्यानंतर सहा रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या 15 रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एमडीआर टीबी झाल्यानंतर उपचारासाठी एक लाखापेक्षा जास्त खर्च लागू शकतो. त्याकडे दुर्लक्ष झाल्यास रुग्णास एक्सडीआर टीबी हा धोकादायक आजार होऊ शकतो. सध्या जिल्ह्यात या आजाराचा एकही रुग्ण नाही.


ही आहेत लक्षणे..
क्षयरोगाची लक्षणे साधी असून, त्यात दोन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला, खोकल्यातून पिवळसर बेडका, चिकट जाडसर थुंकी, थुंकीतून रक्त पडणे, सायंकाळी ताप येणे, वजन कमी होणे, भूक न लागणे ही प्रमुख लक्षणे आहेत.हा आजार टाळण्यासाठी परिसरात स्वच्छता ठेवणे, खोकताना आणि शिंकताना नाका-तोंडावर रुमाल लावणे आवश्यक असते.

1,754 रुग्णांना लागण
जानेवारी ते डिसेंबर 2012 या कालावधीत जिल्ह्यात एकूण एक हजार 754 रुग्णांना क्षयरोगाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यापैकी 950 जणांची थुंकी दूषित, तर 380 जणांची थुंकी अदूषित आढळली. तसेच 174 जणांना फुप्फुसाव्यतिरिक्त क्षयरोग झाल्याचे निष्पन्न झाले. 248 जणांवर शासनाकडून मोफत पुनर्उपचार सुरू आहेत.