आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यावरील अाॅइलवर घसरून तीन दुचाकीस्वार किरकोळ जखमी; 32 हजार रूपये नुकसान भरपाई वसूल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुले मार्केटसमोरील ट्रान्सफॉर्मरला सोमवारी दुपारी टेम्पोने धडक दिल्याने टान्सफॉर्मर फुटले. त्यामधून मोठ्या प्रमाणात ऑइल गळती सुरू झाली. हे ऑइल घेण्यासाठी परिसरातील नागरिक बादल्या मिळेल ते भांडे घेऊन धडपड करीत होते - Divya Marathi
फुले मार्केटसमोरील ट्रान्सफॉर्मरला सोमवारी दुपारी टेम्पोने धडक दिल्याने टान्सफॉर्मर फुटले. त्यामधून मोठ्या प्रमाणात ऑइल गळती सुरू झाली. हे ऑइल घेण्यासाठी परिसरातील नागरिक बादल्या मिळेल ते भांडे घेऊन धडपड करीत होते
जळगाव: टॉवरचौकाकडे जाणाऱ्या टेम्पोने फुले मार्केटसमोरील ट्रान्सफाॅर्मरला धडक दिल्याची घटना सोमवारी दुपारी १२ वाजता घडली. यात ट्रान्सफाॅर्मर फुटल्याने ऑइलची मोठी धार रस्त्यावर लागली होती. हे ऑइल नागरिकांनी बादलीत भरून जमा केले. या घटनेमुळे परिसरात चार तास वीजपुरवठा खंडित झाला होता. रस्त्यावर ऑइल पडल्याने तीन दुचाकीस्वार घसरून किरकाेळ जखमी झाले. दरम्यान, टेम्पाेचालकाकडून महावितरण कंपनीने ३२ हजार रुपयांची नुकसान भरपाई वसूल केली आहे. 
 
चालक मिलिंद श्रीधर भालेराव (औरंगाबाद) हा टेम्पाे (क्रमांक एमएच-१९/एचए-२५६७) घेऊन चौबे मार्केटकडून टॉवरकडे जात हाेता. घाणेकर चौकाजवळील ट्रान्सफाॅर्मरला टेम्पाेने जोरदार धडक दिली. त्यामुळे ट्रान्सफाॅर्मरचे रेडिएटर फुटले. यातील सुमारे १०० लिटर ऑइल रस्त्यावर वाहू लागले. नागरिकांनी हे अाॅइल बादलीत भरून जमा केले. ऑइल रस्त्यावर सांडल्याने या मार्गावरील वाहतूक काही वेळ थांबविण्यात आली होती. रस्त्यावर माती टाकल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. घटनेची माहिती मिळताच विद्युत अभियंता रोहित गोवे यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यास माहिती दिली. पाेलिसांनी टेम्पाेचालकाला ताब्यात घेत त्याच्याकडून शंभर लिटर ऑइल रेडिएटरचे नुकसान झाल्याने ३२ हजार रुपयांची नुकसान भरपाई घेतली. सायंकाळी वीजपुरवठा सुरू झाला. 
 
अाॅइल जमा करण्यासाठी गर्दी 
डीपीचे अाॅइल सांधेदुखीवर उपयोगी पडत असल्याचे सांगत अनेकांनी धावपळ करीत मिळेल त्या भांड्यात ट्रान्सफाॅर्मरचे ऑइल गोळा केले. त्यामुळे ट्रान्सफाॅर्मरजवळ प्रचंड गर्दी झाली होती. काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वीज कर्मचारी नागरिकांना बाजूला करीत होते. मात्र, नागरिक त्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत हाेते. 
 
बातम्या आणखी आहेत...