आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भुसावळ शहरात डेंग्यूचे तीन रुग्ण; उपचार सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- शहरात डेंग्यूचे तीन रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर डॉ. दीपक जावळे यांच्या हॉस्पिटलमध्ये दोन व डॉ. राजेश मानवतकर यांच्याकडे एका रुग्णावर उपचार सुरू आहेत. संततधार पावसामुळे डासांची उत्पत्ती वाढल्याने डेंग्यूने डोके वर काढले आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने या पार्श्वभूमीवर घरोघरी सर्वेक्षण सुरू केले आहे.

शहरातील वर्दळीची ठिकाणे व चौकाचौकात ठेवलेल्या कचराकुंड्यांची नियमित स्वच्छता होत नसल्याने डासांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळेच शहरात डेंग्यूने डोके वर काढल्याचे चित्र निर्माण झाले आहे. डॉ. दीपक जावळे यांच्या हॉस्पिटलमध्ये शरद उपाध्याय, भावना जोशी या दोन रुग्णांच्या रक्ताच्या तपासणीत त्यांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉ. जावळे यांनी सांगितले.

डॉ. राजेश मानवतकर यांच्या हॉस्पिटलमध्येही मुक्ताईनगर तालुक्यातील आम्रपाली सुरवाडे (वय 18) या रुग्णावर उपचार सुरू आहेत. ज्या रुग्णात डेंग्यूची लक्षणे दिसून येतात, त्यांच्या रक्ताच्या तीन तपासण्या केल्या जातात त्यासाठी जवळपास 800 रुपये खर्च येतो. 100 रुग्णांची तपासणी केली तर त्यात दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळतात, असे डॉ. प्रवीण महाजन यांनी सांगितले. थंडीताप, अंगदुखी, डोकेदुखी, अंगावर पुरळ येणे अशी लक्षणे आढळल्यास तत्काळ वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार घ्यावे, असा सल्ला डॉ. राजेश मानवतकर यांनी दिला आहे.