आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खड्ड्यावरील पत्रा वाकल्याने तीन कर्मचारी कोसळून जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गणेशवाडीपरिसरातील एका अपार्टमेंटमधील अतिक्रमण काढताना महापालिकेचे तीन कर्मचारी जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी वाजेच्या सुमारास घडली. जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पालिकेचे अतिक्रमण विभागाचे नऊ कर्मचारी गणेशवाडी परिसरातील मुक्ताई रेसिडेन्सीमधील रहिवाशांच्या भिंतीच्या अतिक्रमणाच्या तक्रारीवरून बांधकाम पाडण्यास दुपारी १२ वाजेपासून गेले होते. अपार्टमेंटमधील घरांपुढील भिंतीचे अतिक्रमण काढताना बाजूच्या सहा फुटी खड्ड्यावर पत्रा टाकून त्यावर कच्चे मटेरिअल टाकले होते. यावर पाय पडल्याने रवींद्र पंडित मराठे (वय ४२), मोहसीन शेख आसिफ (वय ४०), मोहन सोनू गवळी (वय ४५) हे कर्मचारी पडून जखमी झाले. अतिक्रमण निरीक्षकांनी सायंकाळी उशिरापर्यंत कामास करण्यास भाग पाडल्याने कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला.

आयुक्तांनीघेतली भेट
घटनेचीमाहिती मिळताच महापालिकेचे आयुक्त संजय कापडणीस, उपायुक्त प्रदीप जगताप, अभियंता प्रकाश पाटील, अतिक्रमण निरीक्षक एच.एम.खान, उमाकांत नष्टे यांनी जिल्हा रुग्णालयात जखमींची पाहणी केली. त्यांनी जखमींच्या उपचाराविषयी उपस्थित डॉक्टरांकडून माहिती जाणून घेतली. गरज पडल्यास खासगी रुग्णालयात उपचारासाठी वाहने उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या. मात्र, अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना योग्य सुविधा साहित्याअभावी काम करावे लागत आहे. तसेच अतिक्रमण निरीक्षकांच्या मनमानी कारभाराच्या व्यथाही कर्मचाऱ्यांनी या वेळी मांडल्या.

जेवण करण्यास सांगितले
दुपारी साडेबारा वाजता प्रत्यक्ष कामास सुरूवात झाली. दुपारी दोन वाजता कर्मचाऱ्यांना नाश्त्यासह जेवण करून घेण्याचे सांगितले होते. मात्र त्यांनी ते वेळेत केले नाही. कर्मचाऱ्यांवर कामाची कोणतीही सक्ती केली नाही. ते जाणीवपूर्वक हा मुद्दा उपस्थित करीत आहेत. याची आपण आयुक्तांना माहिती दिली आहे. - एच.एम.खान,अतिक्रमण निरीक्षक महापालिका.
जिल्हा सामान्य रुग्णालयात जखमी कर्मचाऱ्याची विचारपूस करताना आयुक्त संजय कापडणीस.

असा झाला अपघात
अतिक्रमित बांधकामाशेजारी सहा फूट खोल खड्डा होता. यावर पत्रे टाकून कच्चे मटेरिअल टाकण्यात आले होते. अतिक्रमणाचे बांधकाम तोडण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी या खड्ड्यावरील पत्र्यांचा आधार घेतला. मात्र एकाचवेळी तिघांच्या वजनाने ही पत्रे वाकल्याने ते खाली कोसळले. यात मोहसीन शेख आसिफ यांच्या पोटावर जखमा झाल्या असून ते गंभीर जखमी आहेत. तर रवींद्र मराठे यांच्या बरगड्यांना जखमा झाल्याने त्यांचा एक्स-रे काढण्यात आला. तर मोहन गवळी यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. तिघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

जेवणाची सुटी दिली नाही
दिवसभरातअतिक्रमित बांधकाम तोडण्याचे ६० टक्के काम पूर्ण झाले होते. त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी सोमवारी आषाढीचा उपवास सोडला नसल्याने अतिक्रमण अधिकारी एच.एम. खान यांना काम थांबवण्याची विनंती केली. मात्र, त्यांना कामाची सक्ती केल्याची तक्रार या जखमींसह अतिक्रमण कर्मचाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात केली. अनेकदा विनंती करूनही खान यांनी ऐकल्याने उपाशीपोटी काम केल्याने तोल गेल्यामुळे हा प्रकार झाल्याचा अारोपही या वेळी करण्यात आला. दरम्यान अपार्टमेंटमधील हा अंतर्गत वाद होता. मात्र, याचा ताण आपणास सहन करावा लागल्याचा संताप कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.