आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओव्यांच्या माध्यमातून मांडला विज्ञानाचा सिद्धांत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - अंकाची दुनिया न्यारी, एक एका किंमत भारी
परी एक अंक किमया करी, शून्य तयाचे नाव भारी
समाजप्रबोधनासाठी गायल्या जाणा-या ओव्या सर्वांनाच परिचित आहेत. या ओव्यांचा वापर करून विज्ञान सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा अनोखा प्रयोग मराठीत प्रथमच होत आहे. पुण्यातील डॉ. पंडित विद्यासागर यांनी सुमारे एक हजार ओव्यांच्या माध्यमातून विज्ञान अधिक रंजक केला आहे.

डॉ. विद्यासागर हे पुणे विद्यापीठात भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत. विज्ञान आणि समाजाचा समतोल साधण्यासाठी विज्ञानाला अगदी सोप्या भाषेत मांडावा, असा विचार गेल्या दहा वर्षांपूर्वी त्यांच्या मनात आला. त्यानंतर त्यांनी त्यावर काम करण्यास सुरुवात केली.

दोन वर्षांपूर्वी त्यांनी वैज्ञानिक, शास्त्रज्ञांचे सिद्धांत ओव्यांच्या माध्यमातून प्रस्तुत केले आहे. ऐकण्यास अगदी रसाळ वाटणा-या या ओव्या मोठमोठ्या सिद्धांतांची फोड करून सांगतात. त्यांच्या या प्रयोगामुळे विज्ञानाचे शिक्षक, विद्यार्थी आणि सर्वसामान्यांना विज्ञान समजून घेण्याची गोडी निर्माण होते. त्यांच्या या प्रयोगामुळे दोन वर्षांत त्यांनी 1000 ओव्या तयार केल्या आहेत. त्यातून अनेक थोर वैज्ञानिकांचे सिद्धांत तोंडपाठ होतील, अशा चाली पुढे येत आहेत. रंजक पद्धतीने विज्ञान शिकवण्याची ही पद्धत चांगलीच लोकप्रिय होऊ लागली आहे.

ओव्यांचे पुस्तक प्रसिद्ध होणार
डॉ. विद्यासागर यांनी तयार केलेल्या ओव्या जतन करण्याच्या दृष्टीनेही त्यांनी प्रयोग सुरू केले आहे. येत्या दोन महिन्यांत त्यांच्या या ओव्यांवर पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून सामान्यांपर्यंत विज्ञान पोहोचणार आहे.

या शास्त्रज्ञांचे सिद्धांत
स्वामीनाथन, फॅरेडे, केपलर, न्यूटन, गॅलिलिओ, जेन्नर, डार्विन, पाश्चर, रामानुजन, बिरबल सहानी, होमी भाभा, साराभाई, बी शैरी, गेंबर, चार्ल्स बाबगे यासह अनेक शास्त्रज्ञांचे सिद्धांत तसेच विश्व, पृथ्वी, वातावरण, सजीव, मानव यांची उत्पत्ती याबाबत ओवीबद्ध माहिती त्यांनी तयार केली आहे.

दोन वर्षांत हजार ओव्या
विद्यार्थी करताहेत प्रचार

डॉ.विद्यासागर यांच्या विभागातील विद्यार्थी या ओव्यांची माहिती खेड्यापाड्यात पोहोचवत आहेत. आधी ओवी गायची आणि नंतर त्याचा अर्थ, ओवीतील शास्त्रज्ञाचा सिद्धांत समजावून सांगायचा असे काम विद्यार्थी करीत आहेत. त्यामुळे खेड्यातील मुलांमध्ये विज्ञान शिकण्याची गोडी निर्माण होत आहे.

जळगावातही होणार प्रचार
28 फेब्रुवारी रोजी जळगावातील निवडक पाच शाळांमध्ये डॉ. विद्यासागर यांनी तयार केलेल्या ओव्यांचे पोस्टर्स लावण्यात येतील. या पोस्टर्समधून विद्यार्थ्यांना विज्ञानाबद्दल किती प्रमाणात आकर्षण वाढते याचे सर्वेक्षण केले जाणार आहे.