आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘टीसी’ने केला २० लाखांचा घोटाळा, भुसावळच्या निरीक्षकावर गुन्हा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - रेल्वेच्या नियमांचे उल्लंघन करणा-या प्रवाशांकडून वसूल केलेल्या दंडाच्या पावत्यांमध्ये १९ लाख ६७ हजार ९८५ रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिस ठाण्यात या प्रकरणी तिकीट निरीक्षक एस. एस. वानले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ रेल्वेच्या वाणिज्य विभागात तिकीट निरीक्षक वानले सेवारत आहे. १ डिसेंबर २०१३ ते १ ऑक्टोबर २०१४ या काळात तिकीट तपासणी करीत असताना त्याने प्रवाशांकडून वसूल केलेल्या दंडाच्या रकमेत अपहार केला. याप्रकरणी विभागीय मुख्य तिकीट निरीक्षक बी. एस. तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरपीएफ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यानंतर शुक्रवारी तिकीट निरीक्षक वानले याला अटक करून रेल्वे न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीश मनीष फटांगरे यांनी त्याला १२ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. डीआरएम महेशकुमार गुप्ता यांनी याबाबत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, दंडाच्या पावत्यांमधील गैरव्यवहाराची गेल्या दोन महिन्यांपासून गोपनीय चौकशी सुरू आहे. मुंबई येथील रेल्वेचे भरारी पथक, अकाउंट विभागाकडूनही वेगवेगळ्या निकषांवर चौकशी केली जात आहे.

प्रवाशांच्या दंडाची रक्कम खिशात
रेल्वेगाडीत नियमांचे उल्लंघन केलेल्या प्रवाशांकडून दंड वसूल करुन संबंधित प्रवाशाला पावती द्यायची. पहिल्या पावतीच्या खाली कार्बन न ठेवता दंड वसूल करायचा. नंतर कार्बन कॉपीवर वेगळी रक्कम टाकून उर्वरित रक्कम लाटायची, असा हा प्रकार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.