आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेवणाच्या डब्याऐवजी आली वडिलांच्या मृत्यूची बातमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - वडील रात्रीच्या जेवणाचा डबा घेऊन येत आहेत, हा निरोप मिळालेली मनीषा जिल्हा रुग्णालयाच्या महिला कक्षाच्या दाराकडे डोळे लावून बसली होती. पण दारातून वडील येण्याऐवजी त्यांच्या अपघाती निधनाचीच बातमी आली. मुलीसाठी जेवण घेऊन जाणार्‍या या बापाचा रस्त्यातच काळाने घास घेतला होता.

जळगावपासून जवळ असलेल्या शिरसोली येथील अशोक भोजू बोडखे हे मनीषा नामक आपल्या मुलीला रात्रीच्या जेवणाचा डबा द्यायला जळगावकडे निघाले होते. मनीषा प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल असून आज-उद्याच तिची प्रसूती होईल, असे डॉक्टरांनी सांगितले होते. आपल्या परिचित असलेल्या गावातीलच शांताराम महिपत महाजन यांच्यासमवेत ते मोटारसायकल (एमएच 19 एव्ही 2567)ने येत होते. देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ त्यांच्या मोटारसायकलला समोरून येणार्‍या क्वॉलीस (एमएच 41 सी 9999)ने जोरदार धडक दिली. यात अशोक बोडखे आणि शांताराम महाजन यांचा जागीच मृत्यू झाला.

अशोक बोडखे यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. मुलगा विशाल याने नुकतीच अकरावीची परीक्षा दिली असून लहान मुलगी छकुलीनेही दहावीची परीक्षा दिली आहे. बोडखे यांच्या एकट्याच्या कमाईवर घराचा उदरनिर्वाह सुरू होता. अडीच वर्षांपूर्वी मोठी मुलगी मनीषा हिचे कुर्‍हा पानाचे येथे लग्न झाले. तिला मुलगी आहे. आता पुन्हा ती गरोदर असल्यामुळे माहेरी आली होती. शुक्रवारी तीच्या प्रसूतीची तारीख देण्यात आली होती. गुरुवारी सकाळी तिला रक्त दिले होते.


अन्य चार जण जखमी
क्वॉलीस गाडीच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्या खड्डय़ात जाऊन थांबली. त्यामुळे गाडीतील प्रवासी विजय भिला चौधरी, त्र्यंबक हरी हटकर, रमेश फकिरा बारी आणि भिकन अशोक पाटील हे चौघे जखमी झाले. ते खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, घटनेची माहिती कळताच शिरसोली गावातील नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती.