आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘टायगर कॉरिडॉर’: मुक्ताईनगर जंगलाचा अभयारण्यात समावेशाचा खडसेंचा आग्रह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- मुक्ताईनगरमधील जंगलात पट्टेदार वाघांचा अधिवास आहे. या वाघांच्या संरक्षणासाठी सातपुडा बचाव कृती समिती ‘टायगर कॉरिडॉर’साठी आग्रही आहे. आता स्वत: विरोधी पक्षनेत्यांनी या मागणीला बळ दिले असून मुक्ताईनगर जंगलाचा व्याघ्र प्रकल्पांतर्गंत अभयारण्यामध्ये समावेशासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत.
वढोदा वनक्षेत्रातील डोलारखेडा (ता.मुक्ताईनगर) परिसर वाघांचा अधिवास आणि सुरक्षित संकरासाठी अतिशय पोषक आहे. हतनूरच्या बॅकवॉटरमुळे पूर्णा नदीकाठ, डोलारखेडा परिसरातील दाट बाभूळवनात वाघांना शिकारीसाठी उपलब्ध रानडुकरे, हरणांची संख्या विपूल आहे. याच वाघांचा मेळघाटापासून ते पुढे सातपुड्यातील अनेर अभयारण्यापर्यंत संचार असतो. मात्र, कायद्याचा दुरूपयोग करून सातपुड्यात वाढलेल्या अतिक्रमणामुळे अन्नसाखळीत सर्वोच्चस्थानी असलेल्या वाघांचा अधिवास नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. यासंदर्भात सातपुडा बचाव समितीने ‘व्याघ्र भ्रमण मार्गा’साठी केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना विनंती करण्यासह शक्य ते सर्व प्रयत्न केले होते. आता मात्र विरोधी पक्षनेते खडसे यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केल्याने पर्यावरण क्षेत्रात काम करणार्‍यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
कॉरिडॉर हवाच
मुक्ताईनगरच्या जंगलात अन्नसाखळीतील सर्वोच्च्स्थानी असलेल्या वाघांचा अधिवास जिल्ह्याला वेगळी ओळख देणारा आहे. या वाघांच्या संरक्षणासाठी मेळघाट ते अनेर अभयारण्य, असा सातपुड्यातील ‘टायगर कॉरिडॉर’ गरजेचा आहे.
-राजेंद्र नन्नवरे, निमंत्रक, सातपुडा बचाव समिती, जळगाव
ट्रॅप कॅमेर्‍यात छबी
डोलारखेडा कम्पार्टमेंटमध्ये 22 मार्च 2012 च्या रात्री ट्रॅप कॅमेर्‍यात पट्टेदार वाघाची छबी टिपली होती. तत्पूर्वी, 1 ते 5 मे 2009 दरम्यान सलग तीनवेळा आणि नंतर 15 जूनला चौथ्यांदा वाघाचे दर्शन झाले. सुकळी गावाजवळ वाघाच्या मादीने तीन बछड्यांना जन्म दिला होता.
- आर.जी.राणे, वनक्षेत्रपाल, मुक्ताईनगर
काही तथ्ये..घटना घडामोडी
>यावल वनविभागात सन 1994-1995 आणि 2003-2004 मध्ये वाघाने हल्ला केल्याच्या 14 घटनांची नोंद.
>डोलारखेडा (ता.मुक्ताईनगर) वनक्षेत्रातील कम्पार्टमेंट क्रमांक 517 मध्ये 21 ऑगस्ट 2010 रोजी वाघाचा हल्ला.
>26 ऑगस्ट 2011 रोजी वनक्षेत्रपाल डी.आर.पाटील यांनी वढोदा रेंजमध्ये बछड्यांसह वाघिणीचे अस्तित्व मान्य केले.
>जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजुरकर यांनी 25 जुलै 2011 ला केलेल्या पाहणीत पगमार्क काढले. औपचारिकपणे वाघाचे अस्तित्व मान्य.
>जळगावचे उप वनसंरक्षक उदय अवसायक यांनी वढोद्यातील वाघाचे अस्तित्व असल्याचे 3 ऑक्टोबर 2011 ला सांगितले.
>18 मार्च 2011 रोजी पाल जंगल परिसरात सावखेडा (ता.रावेर) येथे वाघाच्या अस्तित्वाच्या खुणा आढळल्या होत्या.
>सातपुडा बचाव समितीची एप्रिल 2011 मध्ये जिल्ह्यातील वाघांच्या अस्तित्वासंदर्भात ‘श्वेतपत्रिका’ काढण्याची घोषणा. खान्देश टायगर प्रोजेक्टसाठी प्रस्तावाची तयारी.
>यावल वन्यजीव अभयारण्य आणि खान्देश टायगर प्रोजेक्टसाठी शिष्टमंडळाने नोव्हेंबर 2011 मध्ये घेतली होती केंद्रीय वनमंत्री जयंती नटराजन यांची भेट.
>विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी मार्च 2012 मध्ये वढोदा वनक्षेत्रात ट्रॅप कॅमेर्‍याने टिपलेली छायाचित्र राज्याचे वनमंत्री पतंगराव कदम यांना दाखवली होती.
थोडक्यात महत्त्वाचे
जळगाव-यावल वनविभाग, यावल वनविभाग (वन्यजीव) या तिन्ही विभागांनी एकत्रितपणे ‘टायगर कॉरिडॉर प्रोजेक्ट’साठी पर्यावरण क्षेत्रात कार्यरत संस्था-प्रतिनिधींच्या मदतीने 2012 मध्ये माहिती संकलनास सुरूवात केली. मे 2013 प्राथमिक अहवालास अंतिम रुप देण्यात आले. यानंतर जळगावचे उप वनसंरक्षक सुरेंद्र चोपडे यांनी 21 जून 2013 ला ‘टायगर कॉरिडॉर’साठीच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली. हा प्रस्ताव मंत्रालयात पाठवण्यात आला. यानुषंगाने विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर जंगलाचा व्याघ्र प्रकल्पांतर्गंत अभयारण्यामध्ये समावेशाची मागणी केली. वनमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद अपेक्षा उंचावणार आहे.
विरोधी पक्षनेत्यांची जबाबदारी
सातपुड्यातील वाढते अतिक्रमण रोखण्यासाठी व्याघ्र प्रकल्प अत्यंत गरजेचा आहे. मुक्ताईनगर जंगलाचा अभयारण्यात समावेशाची विरोधी पक्षनेत्यांची विधानसभेतील मागणी पर्यावरणप्रेमींसाठी, ‘सातपुडा बचाव’साठी पुढे टाकलेले एक पाऊल आहे. आता खासदारांनी हा मुद्दा तेवढय़ाच प्रखरतेने केंद्राकडे मांडणे अपेक्षित आहे.