आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाघांचा अधिवास संकटात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - महाराष्ट्रातील एकमेव संवर्धन राखीव क्षेत्र वढोदा (ता.मुक्ताईनगर) येथे आहे. महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध होऊन जेमतेम दोन महिनेसुद्धा न झालेल्या या संवेदनशील जंगलात अतिक्रमण होत असल्याच्या घटना समोर येत आहेत.

सातपुड्याप्रमाणेच वनपट्ट्यांचे आमिष दाखवणार्‍या काही अपप्रवृत्ती यामागे असल्याचे परिसरातील ग्रामस्थ खासगीत सांगतात. सध्या काहीशी मरगळ आलेल्या वनविभागाला ही अपप्रवृत्ती वेळीच ठेचावी लागणार आहे. दुसरीकडे ज्या वाघांमुळे भविष्यात वढोद्याचा कायापालट होऊ शकतो, ते वाघ आणि जंगलाच्या संवर्धन-संरक्षणाची जबाबदारी स्थानिकांनासुद्धा नाकारता येणार नाही; अन्यथा जंगलातील अतिक्रमणांमुळे वन्यप्राणी शेती शिवार व मानवी वस्त्यांकडे येऊन विनाकारण संघर्ष निर्माण होऊ शकतो. अशी वेळच येऊ न देण्यासाठी वनविभाग, स्थानिक ग्रामस्थ व पर्यावरणप्रेमींनी हातात हात घालून काम करणे, हाच एकमेव पर्याय आहे. संवर्धन राखीव क्षेत्राचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी हे करावेच लागणार आहे.
नदीकाठावरही बंधने
वढोदा जंगलाला लागून दक्षिणेकडे पूर्णा नदी आहे. या नदीमुळे समृद्ध झालेल्या जंगलात वन्यप्राण्यांचा अधिवास सुकर झाला आहे. वर्षभर या नदीचे पाणी पिण्यासाठी प्राणी ये-जा करतात. मात्र, डांगरमळे लावणारे नदीकाठाच्या बाजूने वन्यप्राण्यांना प्रवेशच करता येणार नाही, अशा पद्धतीने कुंपण घालतात. प्रसंगी त्यात वीजप्रवाह सोडला जातो.
पाणवठे कोरडेठाक
दाट कुंपणांमुळे वाघांसह इतर वन्यप्राणी नदीकाठावर सहज प्रवेश करू शकत नाहीत. शिकारीवरही बंधने येतात. त्यामुळे पाण्यासाठी कासावीस होणारे प्राणी जंगलातील पाणवठ्यांकडे मोर्चा वळवतात. मात्र, दुर्दैवाने आता अतिक्रमणे उघडकीस आलेल्या डोलारखेडा दक्षिणमधील दोन पाणवठे चक्क कोरडेठाक पडले असून, ही अनास्था घातक आहे.
भुसावळच्या पर्यावरणप्रेमींची भेट
भुसावळमधील उपज, ग्रीन अर्थ आणि क्रिएटिव्ह आय या पर्यावरण संस्थांच्या काही पदाधिकार्‍यांनी गुरुवारी डोलारखेडा दक्षिण भागात जाऊन पाहणी केली व येथील ग्रामस्थांनी जंगल वाचवलेच पाहिजे, अशी भावना व्यक्त केली.
मोठ्या प्रयत्नांनंतर मिळाला दर्जा
मुक्ताई भवानी संवर्धन राखीव क्षेत्राला मोठ्या प्रयत्नांनंतर कायदेशीर दर्जा मिळाला आहे. व्याघ्र अधिवासासाठी पोषक स्थिती असल्यामुळेच हा दर्जा मिळाला. तो टिकवून ठेवण्यासाठी वाघांसोबत जंगलाचे संरक्षण होणे अतिशय महत्त्वाचे आहे.
मोठ्या प्रयत्नांनंतर मिळाला दर्जा
मुक्ताई भवानी संवर्धन राखीव क्षेत्राला मोठ्या प्रयत्नांनंतर कायदेशीर दर्जा मिळाला आहे. व्याघ्र अधिवासासाठी पोषक स्थिती असल्यामुळेच हा दर्जा मिळाला. तो टिकवून ठेवण्यासाठी वाघांसोबत जंगलाचे संरक्षण होणे अतिशय महत्त्वाचे आहे.
मोठ्या प्रयत्नांनंतर मिळालेला दर्जा टिकवण्यासाठी अतिक्रमणे थांबवावी लागतील. कारण असेच चालले तर, वन्यजीवांनी जावे कुठे?
मिलिंद भारंबे, क्रिएटिव्ह आय, भुसावळ
वढोद्यातील वाघ जंगलाची संपत्ती आहेत. भविष्यात स्थानिकांना सोबत घेऊन जंगलात कुठेही अतिक्रमण होणार नाही, यासाठी मेहनत घेऊ.
मधुकर नेमाडे, वनक्षेत्रपाल, मुक्ताईनगर