आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्याघ्र परिसरात दक्षतेचे आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- ‘कॅनन डिस्टेंपर व्हायरस’ची बाधा होऊ नये, यासाठी वाघ असलेल्या परिसरात काळजी घ्यावी, अशा सूचना वन्यजीव विभागाच्या वरिष्ठांकडून प्राप्त झालेल्या आहेत. यानुषंगाने वढोदा (ता.मुक्ताईनगर) वनक्षेत्रातही दक्षता घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मध्यंतरी उत्तर प्रदेशातील दुधवा टायगर रिझर्व्हमध्ये एक वाघ अचानक मृत्युमुखी पडला होता. या वाघाचा मृत्यू कॅनन डिस्टेंपर व्हायरसच्या बाधेने झाल्याच्या निष्कर्षाप्रत वनविभाग आला आहे. यानंतर नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथॉरिटीने (एनटीसीए) देशातील सर्व व्याघ्र प्रकल्पांमध्ये विशेष दक्षता घेण्याची सूचना केली होती. प्रामुख्याने कुत्री आणि मांजर यांच्यापासून अन्य मांसभक्षी प्राण्यांमध्ये हा विषाणू पसरतो. तीव्र ताप, डोळ्यांतून पाणी येणे, सुस्ती, लकवा अशी या आजारांची लक्षणे आहेत. तूर्त यावर कोणताही उपाय नसल्याने वाघाचे अस्तित्व असलेल्या जंगलामध्ये वनविभागाने विशेष लक्ष ठेवले आहे. एखादा मांसभक्षी प्राणी मृतावस्थेत आढळल्यास नेमके कारण शोधण्याबाबत कर्मचारी काळजी घेत आहेत. दरम्यान, यापूर्वी मेळघाटातही एक वाघ मृतावस्थेत आढळला होता. यासंदर्भात मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील संशोधक विशाल पाटील यांनी वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी नमुने हैदराबाद येथील सेंटर फॉर सेल्यूलर अँड मॉल्युकूलर बायोलॉजी आणि पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजिकडे तपासणीस पाठवल्याचे सांगितले.

गुरांचे लसीकरण केले
वन्यजीव विभागातील वरिष्ठांकडून मध्यंतरी कॅनन डिस्टेंपर व्हायरसच्या सतर्कतेबाबत सूचना मिळाल्या होत्या. यापूर्वीच आम्ही यावल अभयारण्यातील गाडर्‍या, जामन्या, ऊसमळी, पाल येथील गुरांचे लसीकरण केले होते. तूर्त आपल्याकडे कोणताही धोका नाही. एम. एन. खैरनार, सहायक वनसंरक्षक (वन्यजीव), यावल

खबरदारी घेतोच
वाघाचा अधिवास असल्याने आम्ही आवश्यक ती खबरदारी घेतोच. विशेषत: वाघाला कोणापासूनही हानी होणार नाही किंवा त्याचा अधिवास धोक्यात सापडणार नाही, यासाठी वनविभागाचे कर्मचारी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवतात. यू.जी.कडलग, उप वनसंरक्षक, जळगाव