भुसावळ- रेल्वेसुरक्षा बलात आतापर्यंत फक्त बॉम्बशोधक श्वान होते. मात्र, रविवारपासून अमली पदार्थ शोधणारा "टायसन' नावाचा नवीन रुबाबदार श्वान पथकात दाखल झाला. त्यामुळे भुसावळ विभाग रेल्वे सुरक्षा बलातील श्वानांची संख्या आठ, तर एकट्या भुसावळातील संख्या तीन झाली आहे.
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात सुरक्षेच्या दृष्टीने आरपीएफचे स्वतंत्र श्वानपथक कार्यरत आहे. आतापर्यंत या बलात तब्बल सात बॉम्बशोधक श्वान होते. मात्र, आता ‘टायसन’ नावाचा आठवा सहकारी टेकनपूर (ग्वाल्हेर, मध्य प्रदेश) येथून दाखल झाला आहे. तो भुसावळात ‘सूर्या’ आणि ‘अमर’सोबत कार्यरत असेल. रेल्वेतील अमली पदार्थ शोधण्याचे विशेष प्रशिक्षण घेऊन रविवारी दाखल झालेला ‘टायसन’ हा डाबरमॅन जातीचा रुबाबदार कुत्रा आहे. ‘टायसन’ला रेल्वेस्थानकावर नेऊन लगेज पार्सल विभागात दररोज सकाळी ९.३० ते दुपारी वाजेपर्यंत तपासणी केली जाते.
मंजुरीची प्रतीक्षा
चोऱ्या शोधणाऱ्या श्वानाची गरज आहे. त्यासाठी आरपीएफ आयुक्त चंद्रमोहन मिश्र यांच्याकडे प्रस्ताव पाठवला आहे. प्रस्तावाच्या मंजुरीनंतर नवीन श्वान दलात दाखल होईल.
- के.एच.जाधव, श्वानपथक प्रमुख, भुसावळ
'टायसन'चा प्रवास
‘टायसन’चे मूळ गाव सातारा असून, २५ सप्टेंबर २०१३ रोजी त्याचा जन्म झाला होता. आरपीएफ दलात तो २९ नोव्हेंबर रोजी दाखल झाला. विशेष प्रशिक्षण घेऊन तो २१ सप्टेंबरला सेवेत परतला. ‘टायसन’चे वजन २२ किलो आहे.