आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तणाव कमी करण्यासाठी संवाद साधणे अत्यावश्यक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव-बारावीची परीक्षा तोंडावर आली आहे. त्यामुळे बारावीतील विद्यार्थ्यांच्या घरातील वातावरण गंभीर होते. मुलांच्या मानसिकतेनुसार वागण्याचा प्रयत्‍न प्रत्येक पालक करतात. त्यांना कोणत्याही प्रकारचा ताणतणाव व त्रास नको यासाठी घरात कमी बोलणे, मोजकेच बोलणे यासारखे प्रकार होतात. मात्र याचा मुलांवर उलट परिणाम होतो. त्यांच्यावर एक प्रकारचे दडपण येते. त्यांचा मानसिक तणाव कमी करण्यासाठी संवाद अत्यावश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
करिअर घडविण्याचा मुख्य टर्निंग पॉइंट म्हणून बारावीकडे विद्यार्थी पाहतात. त्यानुसारच त्यांचा अभ्यास सुरू असतो. करिअरच्या दिशेने झेप घेण्यासाठी अगोदरपासूनच बारावीच्या परीक्षेकडे विद्यार्थी गांभीर्याने पाहत असतात. त्यामुळे परीक्षेच्या काळात घरात पालकांनी त्यांच्यासोबत संवाद साधला नाही तर त्यांच्या मनावरील दडपण आणखी वाढते. आपल्यावर मोठी जबाबदारी आहे, पालकांच्या अपेक्षा पूर्ण करणे शक्य आहे का, अँडमिशन मिळेल का, अशा अनेक विचारांच्या दबावाखाली पाल्य सतत राहतात. त्यामुळे अभ्यासापेक्षा निकालाचाच विचार जास्त होतो. काही वेळा त्यांचा स्वभाव चिडचिडा होतो. त्यांचा दबाव कमी करण्यासाठी त्यांना समजून घेणे गरजेचे आहे. करिअरचे पर्याय उपलब्ध असताना अँडमिशन मिळेल की नाही याबाबत पालकांनीदेखील विचार बदलावे.
मुलांना विश्वासात घ्या
मुलांशी संवाद साधणे आवश्यक आहे. अभ्यास किती झाला, त्यांची अभ्यासाची क्षमता किती आहे याचा आढावा पालकांजवळ असायला हवा. ओझे लादू नये. त्यांना विश्वासात घेऊन ते अधिक चांगल्याप्रकारे अभ्यास कसे करू शकतील हे पाहावे. तसेच तुम्हाला यश मिळायलाच हवे परंतु नाही मिळाल्यास आम्ही तुमच्यासोबत आहोत. या घराची दारे नेहमी तुमच्यासाठी उघडी आहेत, याची जाणीव मुलांना पालकांनी करून द्यावी. डॉ. सतीश पाटील, मानसोपचार तज्ज्ञ.
मुलींमध्ये तणाव वाढल्यास मासिक पाळी अनियमित होते. त्यांना भीती वाटते. अभ्यासामुळे जागरणाचा परिणाम, अँसिडिटीचा त्रास होणे, अशक्तपणा येऊ शकतो. हे टाळण्यासाठी सहा तास झोप, फळांचे सेवन आणि संतुलित आहार घ्यावा. डॉ.जयंती चौधरी, स्त्रीरोग तज्ज्ञ.
आरोग्याकडे द्यावे लक्ष
मानसिक तसेच शारीरिक तणावाच्या नियोजनाप्रमाणेच आरोग्याकडेही लक्ष देणे महत्त्वाचे आहे. वेळेवर पौष्टिक आहार, पाच ते सहा तासांची शांत झोप याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. दीड ते दोन तासानंतरच्या निरंतर अभ्यासानंतर विर्शांती घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे करमणुकीचे पर्याय अवलंबले पाहिजे. त्याकडे दुर्लक्ष करू नये. अभ्यासाचा तणाव कमी करण्यासाठी मित्र, शिक्षक आणि पालकांसोबत संवाद झाला पाहिजे. चर्चेतून तणाव दूर करता येतो. परीक्षेच्या आधी 15 दिवस तणावमुक्त वावरल्याने परिस्थिती बदलेल. त्यासाठी घरातील वातावरण हसतखेळत ठेवावे. पाल्यांवर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो.