आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागेअभावी पटानुसार स्वच्छतागृहांची संख्या अशक्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जागेअभावी शैक्षणिक संस्थांनी गरजेनुरूप स्वच्छतागृहांची बांधणी केली आहे. विद्यार्थ्यांची पटानुसार स्वच्छतागृहांची उपलब्धता करून देणे आजच्या स्थितीत संस्थांना शक्य नाही. मात्र, संस्थांनी स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली आहे.

शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक शाळेत मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे बांधण्यात आलेली आहेत. पण तिची रचना, युनिटची संख्या ही विद्यार्थ्यांच्या पटानुसार केलेली नाही. तसेच मुले आणि मुलींचे स्वच्छतागृह एकाच भिंतीआड आणि दोन्हीकडे जाण्याचा मार्ग एक या दोन समस्यांचे साम्य बहुतेक शाळांत दिसून आले. एकूण स्वच्छतागृहांबाबत संस्थाचालकांची भूमिका जिल्हा शैक्षणिक संस्थाचालक संघटनेचे कार्याध्यक्ष अरविंद लाठी यांच्याकडून जाणून घेतली. या वेळी त्यांनी सांगितले की, शहरातील नामांकित संस्थांमध्ये स्वच्छतागृह मुला-मुलींसाठी वेगवेगळी आणि काही मीटर अंतरावर बांधली आहेत. पण संस्थांकडे कमी जागा असेल तिथे शासनाच्या आराखड्यानुसारच एक भिंतीआड व्यवस्था करावी लागते. परंतु विद्यार्थी पटानुसार युनिटची संख्या हवी हा निकष लावणे चुकीचे आहे. एकाचवेळी स्वच्छतागृहात विद्यार्थी जाणार नाहीत. त्यामुळे आजच्या स्थितीत संस्थांमध्ये बांधलेली स्वच्छतागृहांची संख्या योग्य आहे.

संस्थांवरच स्वच्छतेचा भार
शौचालयांच्या स्वच्छतेसाठी संस्थांना कुठलेच अनुदान शासन पुरवत नाही. तरीही संस्था स्वच्छतेसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करते. आर.आर.शाळेसाठी दरवर्षी पाच ते सहा लाख रुपये संस्था देते. प्रत्येक मजल्यावर स्वच्छतागृहे आहेत. विशेष म्हणजे सिंगापूरच्या धर्तीवर भिंत अथवा स्टाइलची उभारणी न करता स्टीलचा पत्रा लावण्यात आला आहे.

सोयींसाठी अनुदान हवे
शाळेतील एकूण शिक्षकांच्या पगाराच्या आठ टक्के वेतनेतर अनुदान खासगी शैक्षणिक संस्थांना दिले जात होते. 2004 नंतर शासनाने ते बंद केले आहे. त्यामुळे कमी विद्यार्थी संख्या असलेल्या अथवा नवीन शाळांमध्ये स्वच्छतागृहांची निगा राखणे जिकरीचे झाले आहे. त्यामुळे संस्थांना मोठी कसरत करावी लागत आहे. पालिका, जिल्हा परिषदेप्रमाणे खासगी संस्थांना अनुदान देण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे.

पालिकेत स्वच्छतेसाठी यंत्रणा नाही
खासगी संस्थेच्या तुलनेत महापालिका आणि जिल्हा परिषदेतील स्वच्छतागृहांची दुरावस्था आहे. शहरातील महापालिकेच्या शाळेत स्वच्छतेसाठी स्वतंत्र यंत्रणाच उपलब्ध नाही. आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांकडून सोयीनुसार स्वच्छता करून घेतली जात आहे. त्यामुळे अनेक स्वच्छतागृहे पडक्या अवस्थेत आणि दुर्गंधीयुक्त झाले आहेत.