आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Toll Agitation News In Marathi, Political Party, Divya Marathi, Leaders, Dhule

आंदोलनकर्तेच ‘टोल’चे लाभार्थी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - टोल नाक्यांविरोधात आंदोलने करूनही टोल कमी झालेला नाही ; परंतु ही आंदोलने करणा-या राजकीय पक्षांच्या पदाधिका-यांना मात्र टोलमुक्तीचा लाभ मिळत आहे. आंदोलने करणारे पक्ष किंवा संघटनांची नावे सांगितली किंवा तशी ओळखपत्रे दाखविली म्हणजे टोल आकारला जात नाही. त्याचवेळी काही पदाधिका-यांना तर चक्कस्मार्टकार्डसारखे कार्ड देण्यात आले आहे. त्यामुळे हे टोल बंद का होत नाही, या प्रश्नाचे किमान उत्तर यातून मिळायला लागले आहे.

आंदोलनानंतर राजकीय पदाधिका-यांना अपेक्षित असलेला बदल मात्र झाला आहे. त्या बदलामुळे सर्वसामान्यांचा फायदा होत नसला तरी राजकीय पक्षांच्या पदाधिका-यांचा चांगलाच फायदा झालेला आहे. त्यामुळे आता हा विषय पुन्हा चर्चेला येणार नाही, असे बोलले जात आहे. सध्या जिल्ह्यातील तीनही टोल नाक्यांवर राजकीय पक्षाचे जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष तसेच इतर पदाधिका-यांच्या वाहनांना चक्क अनधिकृतरीत्या टोलमाफी देण्यात आलेली आहे. हायवे अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाने दिलेल्या निर्देशांना बगल देत ही टोलमाफी दिली जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. टोल नाक्यांवर राजकीय पक्षनेत्यांच्या खासगी वाहनांचे नंबर टोल कलेक्टरकडे देण्यात आलेले आहेत. त्यानंबरचे वाहन नाक्यावर आल्यानंतर त्यांच्याकडून टोल घेऊ नये, अशा सूचना टोल कलेक्टरला वरिष्ठांकडून देण्यात आलेल्या आहेत. परिणामी असे वाहन नाक्यावर आल्यानंतर शुल्काचा भरणा न करता वाहन पास होत असते. त्यामुळे राजकीय पक्षांच्या नेत्यांनी वाहनावर पक्षाचे नाव टाकून आपल्या वाहनाचा आता व्यावसायिक वापर सुरू केलेला आहे. इतरांसाठी टोलचे अवाजवी शुल्क मात्र आकारलेच जात आहे.

स्थानिक वाहनांना स्मार्टकार्ड
वाहनधारकांनी शंभर रुपये डिपॉझिट भरल्यानंतर हे स्मार्टकार्ड देण्यात येते. त्यासाठी ओळखीचा पुरावा सादर करणे मात्र आवश्यक आहे. स्मार्टकार्डधारकांना लळिंगपासून चांदवडपर्यंत सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. त्यात जर धुळे टोल नाक्यावर 115 रुपये टोल लागत असेल तर सवलत धारकास फक्त 15 रुपये एवढा टोल लागतो.

नियमानुसार ज्या पद्धतीने वसुलीचे निर्देश आहेत. त्याप्रमाणे टोल वसूल केला जात असतो. राजकीय पुढारी किंवा पदाधिका-यांच्या वाहनांना सूटसंदर्भात कोणतेच निर्देश नाहीत. त्यामुळे अधिकृतरीत्या कोणालाच सूट दिलेली नाही. राहुल डांगे, व्यवस्थापक सोमा टोल प्रा. लि.