आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tomorrow Will Be Reduced From 11 Phidarsace Bharaniyamana

उद्यापासून 11 फीडर्सचे भारनियमन होणार कमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शहरातील 11 फीडर्सवरील भारनियमन शनिवारपासून कमी होणार असून, तसे आदेश क्रॉम्प्टनला प्राप्त झाले आहेत. त्यात ‘ए’, ‘बी’, ‘सी’ व ‘डी’ ग्रुपमधील फीडरचा समावेश असल्याचे क्रॉम्प्टनच्या अधिकार्‍यांनी सांगितले. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दरकपातीसह भारनियमन कमी केले जात असल्याचे बोलले जात आहे.

शहरात फीडरनिहाय भारनियमन करावे, अशी मागणी विविध संस्था, संघटना व राजकीय पक्षांनी अनेक दिवसांपासून केली होती. तसेच ‘दिव्य मराठी’नेही याबाबत अभियान राबवले होते. त्यानुसार सद्य:स्थितीत शहरात सव्वा तासाचे भारनियमन केले जात आहे. त्यामुळे नियमित बिल भरणारे ग्राहक या भारनियमनामुळे त्रस्त झाले होते. वसुली व वीजचोरीच्या समीकरणावर भारनियमनाचे गणित ठरवले जात होते. त्याचप्रमाणे वसुलीचे प्रमाण वाढूनही याबाबत कुठलाही निर्णय अद्याप झालेला नव्हता; मात्र महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाकडून बुधवारी याविषयीचे आदेश प्राप्त झाले आहेत. या आदेशाप्रमाणे शनिवारपासून सुधारित भारनियमन केले जाणार असल्याची माहिती क्रॉम्प्टनचे महाव्यवस्थापक र्शीरंग करंदीकर यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

दरम्यान, शहरातील 10 फीडर्ससह ग्रामीण भागातील नशिराबाद, आसोदा व इदगाव ही गावेही थोड्याशा वसुलीअभावी भारनियमनमुक्तीपासून दूर राहिलेली आहेत. राज्यात वीजनिर्मितीचे प्रमाण ज्या दिवशी जास्त असेल, त्या दिवशी हे फीडर्स भारनियमनमुक्त केले जाणार आहेत; परंतु वसुलीचे प्रमाण कमी झाल्यास भारनियमन पूर्ववत होऊ शकते, असेही क्रॉम्प्टनच्या अधिकार्‍यांनी सांगितले.