आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवीगाळप्रकरणी पालिकेत सोमवारी ‘लेखणी बंद’ आंदोलन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - प्रभाग शहर अभियंता व नगररचनाकारांना झालेल्या शिवीगाळ प्रकरणानंतर पालिकेतील अभियंते व कर्मचारी एकत्र आले आहेत. पदाधिकार्‍यांकडून वारंवार दबाव आणला जात असल्याचा आरोप अधिकार्‍यांनी केला आहे. शुक्रवारी घडलेल्या प्रकाराबाबत नगरसेविकेच्या पतीकडून लेखी माफी मागितली जात नाही तोपर्यंत ‘लेखणी बंद’ आंदोलनाचा इशारा अधिकार्‍यांनी दिला आहे.

तातडीचे काम करून देत नसल्याच्या कारणावरून नगरसेविका आशा सूर्यवंशी यांचे पती शांताराम सूर्यवंशी यांनी शुक्रवारी पालिकेत गोंधळ घातला होता. याप्रकरणी शनिवारी अधिकार्‍यांची निषेध सभा झाली. या वेळी प्रभारी शहर अभियंता डी.एस. खडके, नगररचनाकार प्रदीप येवले, प्रभाग अधिकारी उदय पाटील, पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता मोहन चौधरी उपस्थित होते. आपबिती सांगताना खडके म्हणाले की, सूर्यवंशी यांनी मला सर्वांसमक्ष शिवीगाळ केली. नगरसेवक सुनील महाजन व अन्य अधिकारी मध्ये पडले नसते तर कदाचित मला मारहाणही झाली असती. नगररचनाकार येवले यांनी यांनी सांगितले की, सूर्यवंशी अर्थप्राप्तीसाठी नेहमीच आमच्या कार्यालयात येत असतात. काम झाले नाही की, उद्धटपणे वागतात. बांधकाम व्यावसायिकांकडून पैसे घेऊन सूर्यवंशी आमच्याकडून कामे करून देण्यासाठी दबाव आणतात.

असे आहे प्रकरण

स्मशानभूमीसमोर असलेल्या बालाजी मंदिराच्या मोकळ्या जागेत डीपीरोडच्या कामासह दुसरे एक काम अधिकारी करीत नसल्याच्या कारणावरून प्रकरणाला सुरुवात झाली. याच मुद्यावरून नगरसेविका आशा सूर्यवंशी यांचे पती शांताराम सूर्यवंशी यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरीत शुक्रवारी पालिकेत गोंधळ घातला.

संघटनांचाही पाठिंबा

बैठकीत आंदोलनास अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र चांगरे यांनी पाठिंबा जाहीर केला. तसेच शहीद भगतसिंग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनिल नाटेकर, धनगर समाजाचे पदाधिकारी व पालिकेचे कनिष्ठ अभियंता संतोष धनगर यांनीही पाठिंबा दिला असून कर्मचार्‍यांच्या सोबत आम्ही कायम आहे असे सांगितले.

जिल्हाधिकारी, पोलिसात निवेदन

या प्रकरणी प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांना तसेच शहर पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे. या घटनेविरोधात सोमवारपासून लेखणी बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेने राजूरकर यांना दिला आहे.
पुढे काय?
बेशिस्तपणे वागणार्‍या शांताराम सूर्यवंशी यांनी लेखी माफी न मागितल्यास सोमवारी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येईल. लोकप्रतिनिधींच्या विरोधात अधिकारी एकत्र आलेले असल्याने पालिकेतील नगरसेवक देखील एकत्र येण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे पालिकेत अधिकारी विरुद्ध नगरसेवक अशी स्थिती निर्माण होईल.

लेखी माफी मागणार नाही
वॉर्डातील विकासकामे करण्यासाठी लोकांनी आम्हाला निवडून दिले आहे. फायली दाबून ठेवत अधिकारी स्वार्थासाठी सह्या करायला तयारच नसतील तर संताप होणे साहजिक आहे. माझा संताप झाला मात्र मारहाण करण्याचा प्रय} केला हा आरोप खोटा आहे. त्यामुळे लेखी माफी मागणार नाही. शांताराम सूर्यवंशी, (नगरसेविकेचे पती)