आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 'Top', Member Of Parliament,Latest News In Divya Marathi

राज्यातील ‘टॉप फाइव्ह’ खासदारांत जळगावचे दोघे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- देशभरात मोदी लाटेचा तडाखा अनेकांना बसला. वेगवेगळ्या मतदारसंघात जसे दिग्गज पराभूत झाले, तसे महाराष्ट्रातही अनेक बड्या नेत्यांचे राजकीय अस्तित्व संपुष्टात आले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना घरचा रस्ता दाखवताना भाजपच्या काही उमेदवारांनी विक्रमही प्रस्थापित केले आहेत. विशेष म्हणजे राज्यात ज्यांनी सर्वाधिक मताधिक्य मिळवले त्यात जळगाव जिल्ह्यातील दोघा उमेदवारांचा क्रमांक टॉप फाइव्ह मध्ये लागतो. विशेष म्हणजे या दोघा उमेदवारांनी गत निवडणुकीत भाजप उमेदवारांना मिळालेल्या मतांपेक्षा दुप्पट मते या वेळेस मिळवली आहेत.
राज्यात सर्वाधिक मताधिक्य भाजपचे गोपाळ शेट्टी यांना 4 लाख 46 हजार 585 एवढे आहे. ते उत्तर मुंबई मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांनी काँग्रेसचे संजय निरुपम यांचा पराभव केला आहे. दुसर्‍या क्रमाकांचे मताधिक्य जळगाव मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर दुसर्‍यांदा निवडून आलेल्या ए.टी.पाटील यांना आहे. पाटील यांना 3 लाख 83 हजार 52 एवढे मताधिक्य आहे. विशेष म्हणजे त्यांची लढत राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. सतीश पाटील यांच्या सोबत अटीतटीची होईल, असे वाटत असताना ती एकतर्फीच झाली. पाटील यांना स्वत:ला एक लाखांचे मताधिक्यही अवघड वाटत होते. मात्र, मोदी लाटेने त्यांचे मताधिक्य प्रचंड मतांनी वाढले आहे. त्यांना यंदा गेल्या निवडणुकीपेक्षा दुप्पट मताधिक्य मिळाले आहे. ए.टी. पाटील यांच्यानंतर सातार्‍याचे उदयनराजे भोसले या राष्ट्रवादीच्या उमेदवाराने 3 लाख 66 हजार 594 एवढे मताधिक्य मिळवले आहे. त्या पाठोपाठ जळगाव जिल्ह्याच्या रावेर मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार आणि राज्याचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांना 3 लाख 18 हजार 068 एवढे मताधिक्य मिळाले आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार मनीष जैन यांचा पराभव केला आहे. राज्यात पाचव्या क्रमांकाचे मताधिक्य किरीट सोमय्या यांना मिळाले आहे. त्यांना 3 लाख 17 हजार 122 एवढे मताधिक्य मिळाले आहे. राज्यात मोदी लाटेचा प्रभाव दिसून आला आहे. त्यात जिल्ह्यातील उमेदवारांनी लक्षणीय यश मिळवले आहे.