आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिदाबाने घेतला पेट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव-टॉवर चौकातील ट्रान्सफॉर्मरवर प्रमाणापेक्षा जास्त दाब पडल्याने अचानक पेटला. ही घटना मंगळवारी दुपारी 12.26 वाजता घडली. वाहतूक पोलिसांनी अग्निशामक दलाला माहिती दिल्यानंतर ते घटनास्थळी वेळेत पोहचले खरे पण बंबाचा पाईपच निघत नसल्याने आगीवर पाणी मारण्यासाठी 12 मिनिटे उशीर झाला. तर घटना घडून अर्धातासानंतर क्रॉम्प्टनचे कर्मचारी आले तो पर्यंत ट्रान्सफॉर्मर पूर्णपणे खाक झाला होता. विशेष म्हणजे हा ट्रान्सफॉर्मर दरवर्षी उन्हाळ्यात पेटतो.
अग्निशमन विभाग कुचकामी
मंत्रालयाला आग लागल्यानंतर राज्यातील अग्निशमन विभागाची मॉक ड्रिल घेण्यात आली होती. तेव्हाही जळगाव मनपाचा अग्निशमन विभागाचे पोलखोल झाली होती. मंगळवारीही त्याचीच पुनरावृत्ती झाली. दुपारी ट्रान्सफॉर्मर पेटल्यानंतर 17 मिनिटांनी अग्निशमन बंब आला. मात्र 10 मिनिटे पाइपच निघाला नाही. कसाबसा पाइप काढण्यात कर्मचार्‍यांना यश आले. मात्र त्यातून पाणीच आले नाही. शेवटी लहान नळीने पाणी टाकण्यात आले. तो पर्यंत ट्रान्सफॉर्मर खाक झाले होते. आग विझविण्यासाठी 45 मिनिटे लागले.
क्रॉम्प्टनला उशिराने जाग
घटना घडल्यानंतर 39 मिनिटांनी क्रॉम्प्टनचे कर्मचारी पोहचले. त्यानंतर ट्रान्सफॉर्मरचे काम सुरू झाले. सायंकाळी सहापर्यंत ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे काम सुरू होते.
टॅँकच्या मजबुतीमुळे टळला स्फोट
ट्रान्सफॉर्मरमध्ये 400 ते 500 लिटर ऑइल असते. ट्रान्सफॉर्मरला आग लागली तरी, ऑइल टॅँक जाड व मजबूत असल्यामुळे स्फोट होत नाही; टॅँकमधून केवळ ऑइलची गळती होते. तसेच ट्रन्सफॉर्मरमधील लोखंडी कॉइल, पट्ट्या तापतात. अतिउच्च् दाबाने वा केबल जळाल्याने ट्रान्सफॉर्मरमधील ऑइल पेट घेते. एखाद्या वेळेस पेटत्या ट्रान्सफॉर्मरकडे दुर्लक्ष झाल्यास शॉर्टसर्किट होऊन टॅँक फुटण्याची भीती असते; मात्र तोपर्यंत ऑइल टॅँक रिकामा झालेला असतो. टॉवर चौकातील घटना अतिउच्च् दाबामुळे केबल जळाल्याने घडल्याचे क्रॉम्प्टनच्या अभियंत्यांनी सांगितले.
टॉवर चौकात ट्रान्सफॉर्मर पेटल्याने आगीचे असे लोळ उठले होते.
नेहमीच जळते ट्रान्सफॉर्मर
टॉवर चौकातील ट्रान्सफॉर्मर दरवर्षी उन्हाळ्यात जळत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. प्रमाणापेक्षा जास्त दाब पडल्याने, ऑइल गळतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, फ्यूज उडाल्यामुळे, स्पार्किंग झाल्यामुळे तसेच कर्मचार्‍यांनी दुरुस्तीकडे केलेल्या दुर्लक्षामुळे आग लागते.
ओव्हरलोडमुळे जळाले
टॉवर चौकातील ट्रान्सफॉर्मर प्रमाणापेक्षा जास्त दाब पडल्याने जळाले. मेस्कोमातानगरमध्ये अनेकजण आकडे टाकून वीजचोरी करतात त्यामुळे दाब वाढतो. तीन तासात नवा ट्रान्सफॉर्मर बसवून लाइन पूर्ववत करण्यात येईल. भवानीप्रसाद राव, युनिटहेड