आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्य जलवाहिनीला गळती, गुरुवारी होणार दुरुस्तीच्या कामाला सुरुवात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव-शहराला पाणीपुरवठा करणार्‍या वाघूरच्या मुख्य जलवाहिनीला मेहरूण परिसरात गळती सुरू झाली आहे. सोमवारी सकाळी 8 वाजेपासून सुरू झालेल्या गळतीमुळे लाखो लिटर पाणी नाल्यात वाहून जात आहे. गुरुवारी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असून तीन दिवसात या गळतीतून किमान 10 लाख लिटर पाणी वाहून जाणार आहे.
वाघूर धरणावरून जळगाव शहरापर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी 1 हजार 200 मिली मिटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. मेहरूण परिसरातून गिरणा टाकीकडे गेलेल्या या जलविहिनीला मेहरूण परिसरात गळती सुरू झाली आहे. पालिकेचे पाणीपुरवठा विभाग प्रमुख डी. एस. खडके, माजी पाणीपुरवठा सभापती नितीन बरडे यांनी मंगळवारी सकाळी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. जमिनीखालून पाणी गळती होत असल्याने जलवाहिनी किती व कुठे फुटली असेल याचा अंदाज येत नसल्याची स्थिती आहे. गळतीच्या ठिकाणी खोदकाम केल्यावरच दुरुस्तीला किती वेळ लागेल हे सांगता येणे शक्य आहे. त्यामुळे नागरिकांना पूर्वकल्पना देऊनच गुरुवारी दुरुस्तीचे काम हाती घेण्याचा विचार प्रशासनाकडून सुरू आहे.