आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Trade Booming In Chalisgaon Market Committee In The Drought

चाळीसगाव बाजार समितीमध्ये दुष्काळातही व्यवहार तेजीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाळीसागव - कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकर्‍यांनी विक्रीसाठी आणलेल्या धान्यमालाचे वजन विनाकटती होत असल्याने गेल्या महिनाभरात मका व ज्वारीची आवक दुपटीने वाढली आहे. दुष्काळावर मात करीत बाजार समितीने उत्पन्न वाढीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरले आहेत. धान्य व्यवसायातून यंदा 12 कोटींची उलाढाल झाली आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत बाजार समितीत बाहेरील तालुक्यातून ज्वारी, बाजरी व मक्याची आवक जास्त झाली आहे. त्यातल्या त्यात मक्याची आवक फार मोठय़ा प्रमाणात झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून चाळीसगाव तालुक्यात समाधानकारक पाऊस होत नसल्याने शेती उत्पन्नात कमालीची घट झालेली आहे. त्याचा परिणाम बाजार समितीतील धान्य आयातीवर झाला होता. मात्र शेजारील तालुक्यातील शेतकर्‍यांनी या बाजार समितीला तारले. पाचोरा, भडगाव, नांदगाव, कन्नड या तालुक्यातूनही मका, ज्वारीची आवक झाली आहे. त्या तुलनेत नांदगाव व कन्नड या शेजारील जिल्ह्यातील शेतीमाल मोठय़ा प्रमाणात येथे येत आहे.

गव्हाच्या उत्पन्नावर परिणाम
दुष्काळामुळे स्थानिक परिसरातील शेतकर्‍यांनी रब्बी गहू पिकांचे पाण्याअभावी उत्पन्न न घेतल्यामुळे बाजारात अतिशय कमी प्रमाणात गहू विक्रीसाठी येत आहे. व्यापारीवर्ग बाहेरील गहू विक्रीसाठी बाजारात आणत आहेत. मागील वर्षापेक्षा गव्हाच्या किमतीत वाढ झालेली आहे. 1500 ते 1800 रुपये क्विंटलने विकला जाणारा गहू चालू वर्षी 1800 ते 2400 रुपये क्विंटलने विक्री होत असल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.


2012 मधील मालाची आवक व उलाढाल


जानेवारी 34,527 क्विंटल किंमत 4,07,51,404 रुपये
फेब्रुवारी 17,239 क्विंटल किंमत 2,12,97,355रुपये
मार्च 22,710 क्विंटल किंमत 3,00,64,750 रुपये


एकूण आवक 74,366 क्विंटल
एकूण उलाढाल 9,21,13,509 कोटी

2013 मध्ये मालाची आवक वाढली

जानेवारी 45,331 क्विंटल किंमत 6,28,80,211
फेबुवारी 20,611 क्विंटल किंमत 2,92,23,944
मार्च 20,425 क्विंटल 2,71,06,150


एकूण आवक 86,367 क्विंटल
एकूण उलाढाल 11,92,10,305


उपाय ठरताय लाभदायी
वजन विनाकटती होत असल्यानेच शेतकर्‍यांचा ओढा चाळीसगाव बाजार समितीकडे आहे. शिवाय भावही नगदी मिळत आहे. या दोन कारणांनी दुष्काळी स्थितीतही बाजार समितीतील व्यवहार तेजीत आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी बाजार समितीने केलेला इलाज फायदेशीर ठरला आहे.