आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुढीच्या जोखडात अडकलेल्या नोकरशाहीला आले शहाणपण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- रूढीच्या जोखडात अडकलेल्या नोकरशाहीला सत्याग्रह आंदोलनामुळे शहाणपण आले. डॉ, स्नेहल यांच्या नावानंतर तिच्या वडीलांचे नाव लावण्याची तयारी दाखवत तशी शिधापत्रिकाच तिच्या परिवाराला सोमवारी देण्यात आली.
नंदुरबार येथील शिवराम पाटील यांचा मुलगा समीर व सून स्नेहल हे दोघे डॉक्टर आहेत. दोघे जळगावात स्थायिक झाल्यानंतर डॉ.समीर यांनी रेशनकार्डसाठीच्या अर्जावर पत्‍नीचे नाव ‘स्नेहल हिरालाल पाटील’ असे लिहिले आहे; मात्र लग्नानंतर वडिलांचे नव्हे, तर पतीचेच नाव लावले पाहिजे, असे सांगत तत्कालीन तहसीलदार कै लास देवरे व विद्यमान तहसीलदार गोविंद शिंदे यांनी तशी मागणी बेकायदेशीर ठरवली होती; परंतु ‘दिव्य मराठी’ने सन 2011मध्ये महाराष्ट्र सरकारच्या राजपत्रात जारी झालेल्या अधिसूचनेबाबतची माहिती उघड केल्यानंतर शिधापत्रिकेचा मार्ग मोकळा झाला. सोमवारी तहसिलदारांनी ही शिधापत्रिका तयार केली होती, पण अर्जदार स्वत: आल्याशिवाय ती न देण्याचा निर्णय घेतला होता. अखेर दुपारी प्रशासनाने माघार घेत पवार परिवाराला शिधापत्रिका सन्मानपुर्वक प्रदान केली आणि गेल्या काही दिवसापासून सुरू असलेला लढा थांबला.
आग्रहानंतर प्रशासनाची माघार
शिधापत्रिका कोणाच्या नावाने द्यावी, याबाबत कुठेही नमूद नाही. त्यामुळे प्रांताधिकारी अभिजित भांडे यांच्याशी चर्चा करून शिधापत्रिका तयार केली आहे. मात्र मूळ अर्जदारालाच ती दिली जाईल, असा आग्रह धरणार्‍या प्रशासनाने नंतर माघार घेत सत्याग्रह करणार्‍या शिवराम पाटील यांच्याकडेच शिधापत्रिका दिली.
शिधापत्रिकेवर डॉ.स्नेहल यांना न्याय
आर्थिक स्थिती नसतानाही वडिलांनी शिकवून डॉक्टर केल्याने त्यांचे नाव जन्मभर आपल्या नावाशी जोडलेले असावे, अशी इच्छा बाळगलेल्या डॉ.स्नेहल यांची इच्छा पूर्ण झाली आहे. डॉ.समीर यांनी शिधापत्रिकेसाठी केलेल्या अर्ज क्रमांक 510नुसार ‘381426’ अनुक्रमांक असलेली शिधापत्रिका तयार करण्यात आली. त्यावर कुटुंबप्रमुख म्हणून ‘स्नेहल हिरालाल पाटील’ असे नमूद केले आहे. तसेच शेवटच्या पानावर पहिल्या क्रमांकावर ‘स्नेहल हिरालाल पाटील’ असे नमूद केले.
शिवराम पाटलांचा ‘आप’वर आक्षेप
गेल्या पाच दिवसांपासून शिधापत्रिका मिळण्यासाठी तहसील कार्यालयात सत्याग्रह करीत असताना आम आदमी पक्षाचे कोणीही फिरकले नाही. सोमवारी प्रा.शेखर सोनाळकर व अँड.पंडित कुमार राजे सकाळी 11 वाजता आले. त्यांनी तहसीलदारांशी चर्चा केली आणि दुपारी 1.30 वाजता निघून गेले. या ठिकाणी आम आदमी पक्षाचे नव्हे, तर ‘खास’ आदमीचे लोक असल्याचा आरोप शिवराम पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला.