आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोठे गेली वाहतुकीची शिस्त, नगराध्यक्षांची बैठक वांझोटी ?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - शहरातील वाहतूक बेशिस्त झालेली आहे. या वाहतुकीला आळा घालण्यासाठी, अपघात टाळण्यासाठी काही कटू निर्णय घ्यावे लागले तरी चालेल. यासाठी वाहतूक शाखेसोबत विशेष मोहीम राबविण्याचा मनोदय नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी 2 जानेवारीला घेतलेल्या बैठकीत व्यक्त केला होता. मात्र, बैठकीला 15 दिवस होवूनही या विषयात कवडीची सुद्धा प्रगती झालेली नाही. अवाढव्य आकाराच्या खासगी ट्रॅव्हल्स (लक्झरी)ला शहरात प्रवेश बंदी करण्यासाठी संबंधितांना नोटीस देण्याची वाहतूक शाखेने भूमिकाही व्यर्थ ठरू पाहत आहे. थोडक्यात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी घेतलेली ही बैठक वांझोटी ठरत आहे.
नगराध्यक्ष नेमाडे यांनी सोमवार 2 जानेवारीला वाहतुकीचा प्रश्न या विषयावर पोलिस अधिकारी आणि पालिका प्रशासनाची महत्त्वाची बैठक घेतली होती. या बैठकीनंतर दिवसेंदिवस वाढत जाणारी वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी काही ठोस प्रयत्न होतील, अशी भुसावळकरांची अपेक्षा होती. मात्र, बैठकीला पंधरा दिवस होवून नगराध्यक्षांसह वाहतूक शाखेची कृती शून्य आहे. वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी पालिकेजवळील रेल्वेचा मार्ग लहान वाहनांसाठी खुला करावा, या मागणीसाठी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडे सादर करावयाच्या प्रस्तावाचे काय झाले? याबाबतही संभ्रम आहे. पोलिस प्रशासनाचे सर्वांशी असलेले स्नेहाचे संबंध आणि राजकीय आश्रयामुळे वाहनधारकांचे होणारे हाल कायम आहेत. नगराध्यक्षांनी घेतलेल्या बैठकीत वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक विश्वजित खुळे यांनी ट्रॅव्हल्सला शहरात बंदी करून त्या तिरुपती पेट्रोलपंपाच्या पुढे येणार नाहीत. यासाठी संबंधितांना नोटीस देवू,अशी भूमिका घेतली. मात्र, पंधरा दिवसात त्यांना नोटीस काढायची सवड मिळालेली नाही.
ट्रॅव्हल्सला आहे राजकीय आश्रय - भुसावळमधील शिवाजी व्यापारी संकुलात बहुतांश खासगी ट्रॅव्हल्सची कार्यालये आहेत. सकाळी आणि सायंकाळी या संकुलाजवळ आकाराने भल्यामोठ्या ट्रॅव्हल्स रस्त्याच्या दोन्ही बाजूने उभ्या असतात. आधीच अरूंद असलेल्या रस्त्यांवर या ट्रॅव्हल्समुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. मात्र, ना पालिका ना वाहतूक शाखा, या वाहनांवर कारवाईची हिंमत दाखवत नाही.