आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दररोजची कटकट: टेम्पो बिघडला; तास महामार्ग ठप्प, चारही बाजूला रांगा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- अजिंठा चौफुलीवर वाहतूक ठप्प होण्याचा प्रकार नित्याचाच झाला आहे. तरीदेखील ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याचे जळगावकरामध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. मंगळवारीदेखील अजिंठा चौफुलीवर एक टाटा-४०७ (टेम्पो) वाहन बिघडल्याने सकाळी १० ते दुपारी वाजेपर्यंत वाहतूक ठप्प झाली हाेती. त्यामुळे आकाशवाणी ते टीव्ही टॉवरपर्यंत वाहनाच्या राग लागली होती. दरम्यान, अजिंठा चौफुलीवर रस्त्यांच्या मध्ये दुभाजक नसल्याने वाहनचालक बेशिस्तपणे कुठेही वाहने चालवून ट्रॅफिक जाम करतात. दुभाजक तयार करण्यासाठी शहर वाहतूक शाखेने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (नही)कडे महिनाभरापूर्वीच परवानगी मागितली आहे. मात्र, त्यांनी अजूनही ती दिलेली नसल्याने वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत आहे.
अजिंठा चौफुलीवर मंगळवारी टाटा-४०७ (क्र.एमएच-१८-क्यू-८७०) बंद पडल्याने सकाळी १० ते दुपारी वाजेपर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे आकाशवाणी चौफुली ते टीव्ही टॉवरपर्यंत आणि अजिंठा रस्त्यावर कब्रस्तान ते रेमंड चौफुलीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वास्तविक अजिंठा चौफुलीवर वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी उपस्थिती आवश्यक आहे. मात्र, अनेक वेळा या ठिकाणी पोलिस जागेवर नसल्याने वाहतुकीचा खोळंबा होतो. तसेच महामार्गावर दोन्ही बाजूला अतिक्रमणे झाल्यानेदेखील वाहतूक ठप्प होत असते. याबाबत वाहनधारकातर्फे अनेक वेळा वाहतूक शाखेकडे तक्रार करूनही त्यांचा काही एक उपयोग होत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
शहरातील प्रत्येक चौकात वाहतूक पोलिस ड्यूटीवर असतानाही वाहतूक का ठप्प होते? हा संशोधनाचा विषय झाला आहे. अजिंठा चौफुलीवर नेहमीच होणाऱ्या वाहतुकीच्या खोळंब्यामुळे शहर वाहतूक शाखेने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे एप्रिल महिन्यात दुभाजक तयार करण्यासाठी परवानगी मागितली होती. त्यासाठी तुलसी पाइप कंपनी दुभाजक तयार करण्यास तयार आहे. मात्र, ‘नही’कडून अजूनही परवानगी मिळाल्याने दुभाजकाच्या कामाला मुहूर्त मिळालेला नाही.

अंजिठा महामार्गावर वाहतूक ठप्प झाल्याने चारही बाजूला दूरपर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे चौफुलीवर वाहनधारकांचा गोंधळ उडाला होता. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांची दमछाक झाली. पोलिस एका एका बाजूची वाहतूक सुरळीत करीत असताना वाहनधारक त्यांची नजर चुकवून मिळेल त्या जागेतून वाहन घेऊन जात होते.
त्यामुळे कोंडी सुटण्यास वेळ लागला.
‘दिव्य मराठी’चाही पुढाकार
वाहतुकीची समस्या सोडवण्याबाबत आणि अजिंठा चौफुलीच्या सुशोभिकरणाबाबत ‘दिव्य मराठी’ने अभियान राबवले होते. त्यामुळे रस्त्यावर बेशिस्तपणे उभ्या करणाऱ्या ट्रकचालकांवर कारवाई सुरू झाली होती. पण, या कारवाईत सातत्य राहिल्याने पुन्हा-पुन्हा वाहतुकीचा खोळंबा होत आहे. अपघात, बंद पडलेली वाहने आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे चौफुलीवर कायमच ट्रॅफिक जाम असते. यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक यू. जी. चामर गोरे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
दुभाजकाबाबत ‘नही’चे अद्याप उत्तर नाही
अजिंठा चौफुलीवर दुभाजक नसल्याने नेहमीच ट्रॅफीक जाम होते. त्यासाठी ‘नही’कडे महिना भरापूर्वी परवानगी मागितली होती. त्यासाठी उशीर होऊ नये म्हणून कर्मचाऱ्याच्या हस्ते पत्र पाठविले होते. मात्र त्यांचे अजून उत्तर आलेले नाही.
चंद्रकांत सरोदे, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा
बातम्या आणखी आहेत...