आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाहतूक पोलिसाची रिक्षाचालकाला मारहाण; दीड तास रास्ता राेको

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रिक्षाचालकाला मारहाणीनंतर संतप्त झालेल्या चालकांनी एकत्र येऊन नेरी नाका परिसरातील वाहतूक बंद पाडली.)
जळगाव- गाडीचे कागदपत्र मागितल्यानंतर रिक्षाचालकाने आधी कुणाला तरी फोन लावला. याचा राग आल्याने वाहतूक पोलिसाने रिक्षाचालकाला पट्ट्याने मारहाण करून मोबाइल फोडल्याची घटना रविवारी सकाळी ११ वाजता नेरीनाका स्मशानभूमीजवळ घडली. या घटनेमुळे संतप्त रिक्षाचालकांनी घोषणाबाजी करीत दीड तास रास्ता रोको आंदोलन केले. अखेर पोलिसांनी मागणी मान्य केल्यानंतर रिक्षाचालकांचे आंदोलन निवळून वाहतूक सुरळीत झाली.

दाणाबाजार येथील नितीन मोहन टकले (वय २६, रा. शिवाजीनगर लाकूडपेठ) हे मालवाहू रिक्षा घेऊन (एमएच १९ एस ६८३८) एमआयडीसीकडून शहरात येत होते. याच वेळी स्मशानभूमीजवळ ड्यूटीवर असलेले वाहतूक पोलिस ईश्वर सोनवणे यांनी टकले यांची रिक्षा अडवली. सोनवणे यांनी त्यांच्याकडे कागदपत्र, परवान्याची मागणी केली. हे दाखवण्यापूर्वी टकले यांनी कुणाला तरी फोन केला. याचा राग आल्याने सोनवणे यांनी कमरेचा पट्टा काढून टकलेंना मारहाण केली. तसेच टकले यांच्या हातातील मोबाइल हिसकावून फोडून टाकला. मारहाणीमुळे टकलेदेखील संतापले होते. याच वेळी रस्त्याने जाणाऱ्या इतर रिक्षाचालकांनी मारहाणीची घटना पाहून इतर रिक्षाचालकांना फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले.

महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख नीरज जैसवानी हेदेखील घटनास्थळी आले. सोनवणे यांनी माफी मागावी, अशी अट धरून सर्व रिक्षाचालकांनी थेट रास्ता रोको सुरू केला. तसेच वाहतूक पोलिसांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. ११ वाजेपासूनच सुरू झालेला हा वाद अखेर साडेबारा वाजता मिटला. या रास्ता राेकोमुळे शहरातून एमआयडीसीकडे जाणारी संपूर्ण वाहतूक खोळंबली होती. दीड तासानंतर पोलिसांनी मोर्चेकऱ्यांची मागणी मान्य केल्यानंतर रस्ता मोकळा करण्यात आला.

रिक्षाचालकांनी नियमांनी वागणे अपेक्षित
^वाहतूकपोलिसाने रिक्षचालकाला मारहाण करण्यात आलेल्या घटनेची दखल घेण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिस उपअधीक्षकांना चौकशीचे आदेश दिले आहेत. रिक्षाचालकांनीही नियमांनी वागणे अपेक्षित आहे. ते नियम मोडत असतील तर कठोर कारवाई करण्यात येईल. डॉ.जालिंदर सुपेकर, जिल्हा पोलिस अधीक्षक

सोनवणेंवर अदखलपात्र गुन्हा
मारहाणकरणारे वाहतूक पोलिस सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना दोन दिवसांत निलंबित करावे, अशी मागणी आंदोलकांनी लावून धरली होती. त्यानुसार दुपारी दीड वाजेच्या सुमारास टकले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोनवणेंच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिक्षाचालकच का टार्गेट?
वाहतूकपोलिस केवळ रिक्षा, दुचाकींवर कारवाई करीत अाहेत. पॉश चारचाकी वाहनांची तपासणी करीत नाहीत. त्यातील चालक सिटबेल्टही लावत नाहीत, तरीदेखील पोलिस कानाडोळा करतात. रिक्षाचालकांना मेमो दिल्यानंतरही पैसे मागतात. असा आरोप या वेळी रिक्षाचालकांनी केला. नीरज जैसवानी, रवींद्र सोनार, सचिन कदम, हिरामण पाटील यांच्यासह सुमारे १०० रिक्षाचालकांनी या रास्ता रोकोमध्ये सहभाग घेतला होता. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन बागुल, पोलिस उपनिरीक्षक समाधान पाटील यांनी घटनास्थळी येऊन आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, रिक्षाचालक चांगलेच संतापात असल्यामुळे त्यांनी दीड तास वाहतूक रोखून धरली.
बातम्या आणखी आहेत...