आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रॅफिक पोलिसाने मागितली 12 हजार रुपयांची लाच, मोबाइल शूटिंगमुळे वाहतूक शाखेने मिटवले प्रकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या एका चारचाकी चालकाकडून १२ हजार रुपयांची लाच मागितल्याचे गाडीतच मागच्या सीटवर बसलेल्या एकाने मोबाइलमध्ये रेकॉर्डिंग केले. हा प्रकार लक्षात येताच वाहतूक पोलिसाच्या चेहऱ्याचा रंग उडाला. नंतर त्याने कायदेशीर कारवाई करण्याचा आव आणला. 
 
सुमारे तीन तास चाललेल्या या ‘रोड शो’ची समाप्ती वाहतूक विभागाच्या कार्यालयात झाली. दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधात तक्रार देता ‘तडजोड’ करून वाहतूक शाखेनेच प्रकरण निकाली काढले. मात्र, हा प्रकार पाहणाऱ्या नागरिकांच्या मनात पोलिसांची प्रतिमा मलिन झाली. 
 
मुंबईतील एका वाहतूक पोलिसाने आपल्याच खात्यात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराविराेधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याच्या दुसऱ्याच दिवशी जळगावात हा प्रकार घडला. चारचाकीतील प्रवासी त्र्यंबकेश्वर,शिर्डीची सहल अाटोपून छत्तीसगडकडे जात होते. त्यावेळी आकाशवाणी चौकात हा प्रकार घडला. या प्रकरणानंतर संबंधित वाहतूक पोलिसाला वरिष्ठांनी खडसावून समज दिली. 
 
शहर वाहतूक शाखेतील पाेलिस नाईक आकाशवाणी चौकात ड्यूटीवर होते. रविवारी दुपारी १२ वाजता प्रभात चौकातून सीजी-०४/डीएम-८००१ या क्रमांकाची चारचाकी आकाशवाणी चौकात अाली. ड्यूटीवर असलेल्या वाहतूक पोलिसाने चारचाकी थांबवून चालकाकडून कागदपत्रे तपासणीसाठी मागितली.
 
छत्तीसगड येथे राहणारे निरंजनकुमार त्यांचे तीन मित्र चारचाकीत होते. त्यांनी पोलिसांना कागदपत्रे दिली. वाहतूक पोलिसाने ही कागदपत्रे तपासल्यानंतर पीयूसी नसल्याचे आढळून आले. त्यामुळे दंड भरावा लागेल, असे त्याने निरंजनकुमार यांना सांगितले.
 
 चारचाकीमधील प्रवाशांनी पीयूसीची मुदत संपलेली नसल्याचा दावा करीत वाद घातला. काही क्षणात वाहतूक पोलिस प्रवासी यांच्यात मोठा वाद सुरू झाला. दोन्ही जण आपली बाजू लावून धरत होते. यातच तडजोडीच्या उद्देशाने वाहतूक पोलिसाने १२ हजार रुपयांची मागणी केली. प्रवाशांनी सुमारे अर्धा तास विनंती केल्यानंतर हजार रुपयांमध्ये तडजोड करण्याचे ठरले.
 
दरम्यान, हा वाद सुरू असताना वाहतूक पोलिसाने १२ हजार रुपये मागितले धमकावल्याचा सर्व प्रकार चारचाकीत मागच्या सीटवर बसलेल्या एका प्रवाशाने मोबाइलच्या कॅमेऱ्यात कैद केला. यानंतर त्यांनी हे शूटिंग त्या वाहतूक पोलिसाला दाखवले. 
 
शूटिंग पाहताच पोलिसाच्या चेहऱ्याचा रंग उडाला. त्याने आपण कायदेशीर कारवाई करीत असल्याचा आव आणला; पण हातात लाच मागितल्याचे शूटिंग असल्यामुळे चारचाकीतील प्रवाशांनी थेट पाेलिस अधीक्षक कार्यालय गाठले. रविवार असल्यामुळे त्यांना पोलिस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर भेटले नाहीत. त्यामुळे त्यांनी वाहतूक शाखेच्या कार्यालयात आपली कैफियत मांडली. येथे सुमारे दोन तास चर्चा झाल्यानंतर तडजोड करण्यात आली. प्रवाशांनी तक्रार करताच, तर वाहतूक शाखेने दंड घेता या प्रकरणावर पडदा टाकला. 

वाहतूक पोलिसाने दंडापोटी सहाशे रुपये घेतले. मात्र, नंतर ‘यू टर्न’ घेत पैसेच घेतले नसल्याचा दावा केला. तसेच गाडीचे स्मार्टकार्डही गहाळ केले, असा आरोप चारचाकीतील युवकांनी केला होता. काही वेळाने गाडीची तपासणी केली असता, त्यात स्मार्टकार्ड आढळून आले. मात्र, ते सहाशे रुपये कुठे गेले? याचा पत्ता लागला नाही.
 
दरम्यान, संबंधित युवकांनीच आपल्याशी गैरवर्तन केले. मला घेरून दमदाटी केली; वाहतुकीचा खोळंबा करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप वाहतूक पोलिसाने केला होता. या युवकांविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी वाहतूक पोलिसाने वरिष्ठांकडे केली होती. 
 
पैसे मागू नका, असे दटावले 
-घडलेल्या प्रकारानंतर वाहतूक विभागाच्या कार्यालयात चार युवक आले होते. त्यांनी मोबाइलमध्ये केलेले शूटिंग मला दाखवले. व्यवस्थित वागा; पैशांची मागणी करू नका, अशा शब्दात संबंधित कर्मचाऱ्याला दटावले आहे. अनिलदेशमुख, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा 
 
या प्रकाराच्या व्हिडिओ क्लिप युवकांनी तयार करून ठेवल्या होत्या. हा प्रकार अत्यंत गंभीर असल्यामुळे वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख हे दोघे तातडीने कार्यालयात आले. त्यांच्यासमोर युवकांनी लाच मागितल्याचा व्हिडिओ दोन्ही अधिकाऱ्यांना दाखवला. व्हिडिओ पाहून अधिकारीदेखील थक्क झाले. सुमारे दीड तास काय करायचे? या विषयावर चर्चा सुरू होती. या वेळी संबंधित वाहतूक पोलिस आणि चारचाकीतील तरुणांमध्ये पुन्हा वादविवाद सुरू झाले. 
 
मात्र, प्रकरण मिटले नाही. त्यामुळे काही वेळानंतर पोलिस निरीक्षक देशमुख कार्यालयातून निघून गेले. त्यानंतर सहायक निरीक्षक देशमुखांनी कमान सांभाळली. त्यांनीदेखील अर्धा तास चर्चा केली. अखेर एकमेकांविरोधात तक्रार द्यायची नाही आणि हे प्रकरण येथेच संपवायचे यावर वाहतूक पोलिस आणि तरुणांमध्ये या मुद्द्यावर तडजोड झाली. त्यानंतर चौघे युवक कार्यालयातून बाहेर पडले. 
 
माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना झालेल्या प्रकाराची माहिती विचारली. निरंजनकुमार यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली. मात्र, आम्ही तक्रार देत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रकरण सेट झाल्यानंतर चौघे प्रवासी निघून गेले. चारचाकीचालकाची चूक होती तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे हाेती; पण आपल्याच विभागातील कर्मचारी लाच मागत असल्याचे दिसून अाल्यामुळे वरिष्ठांनीदेखील प्रकरण मिटवून टाकले. 
 
बातम्या आणखी आहेत...