आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोंगळ कारभार : आरोग्य विभागातही बदलीचा गोंधळ!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - जिल्हा परिषदेंतर्गत नियमांची पायमल्ली करीत पदोन्नती व बदली देण्यात येत असल्याची माहिती केंद्रप्रमुखांच्या पदोन्नतीतून समोर आली आहे. आता आरोग्य विभागातील कर्मचा-यांना देखील अशाच प्रकाराला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील लामकानी येथील विधवा परिचर महिलेचा प्राधान्यक्रम डावलत त्यांना विनंती बदलीपासून वंचित ठेवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या महिलेने मुख्यकार्यकारी अधिका-यांकडे तक्रार केली तरी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.

शिक्षण विभागाप्रमाणे आरोग्य विभागातही पदोन्नतीचा गोंधळ समोर येऊ लागला आहे. लामकानी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात संगीता कैलास महाले या विधवा महिला परिचर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी तालुक्यांतर्गत बदलीसाठी पंचायत समितीच्या गटविकास अधिका-यांकडे अर्ज सादर केला होता. पंचायत समितीत विनंती बदलीसाठी 31 मे रोजी समुपदेशन घेण्यात आले. या वेळी संगीता महाले यांना डावलत वय वर्षे 53 असलेल्या दोन परिचर कर्मचा-यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत. 15 मे 2014च्या शासनाच्या नियमानुसार प्रकरण 1-4नुसार विधवा कर्मचा-यांचा ज्येष्ठता क्रम 7 आहे व वयाची 53 वर्षे पूर्ण करणा-या कर्मचा-यांचा ज्येष्ठता क्रम 10 त्यामुळे प्राधान्यक्रमानुसार विनंती बदलीस संगीता महाले पात्र होत्या; असे असताना त्यांना डावलत 53 वर्षे पूर्ण झालेल्या दोन महिला कर्मचा-यांची बदली करण्यात आली आहे.
मुळात सध्या कार्यरत ठिकाणी महाले यांची सेवाबदली करण्यात आलेल्या कर्मचा-यांपेक्षा जास्त झालेली आहे. तरी देखील प्रभारी गटविकास अधिकारी अक्काबाई मोरे यांनी ज्येष्ठतेच्या क्रमाला तिलांजली देत महाले यांना वंचित ठेवलेले आहे. यासंदर्भात पीडित संगीता देसले यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांच्याकडे तक्रार केलेली आहे. मात्र, मुख्यकार्यकारी अधिका-यांनी देखील या तक्रार अर्जाकडे दुर्लक्ष केले आहे.

- शासन नियमाप्रमाणे विनंती बदलीवर हक्क असताना या हक्कापासून वंचित ठेवण्यात आलेले आहे. गटविकास अधिका-यांनी यादरम्यान आपले म्हणणे एकूण घेतले नाही. कौटुंबिक अडचणींमुळे बदलीची विनंती केली होती.
संगीता महाले, विधवा परिचर, लामकानी