आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Transfer Money From The Difficulty Limita Green Card

ग्रीन लिमीट कार्डमुळे पैसे ट्रान्सफरची अडचण दूर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव-बाहेरगावी शिक्षण घेणार्‍या मुलांच्या खात्यात पैसे भरण्याची पालकांना येणारी अडचण आता स्टेट बँकेच्या ग्रीन लिमीट कार्डद्वारे दूर होणार आहे. याला पालकांबरोबरच उद्योजक, व्यावसायिकांकडून मागणी होत आहे.
मोबाइल आणि इंटरनेट बँकिंगमुळे ग्राहकांना घरबसल्या अनेक सुविधा उपलब्ध होत आहेत. अलीकडे बँकांनीही पैसे काढण्यासोबत इतरही 24 तास सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आगामी काळात स्टेट बँकेचे ई-कॉर्नर शहरामध्ये उपलब्ध होणार आहे. यासाठी ग्राहकांना नवीन तंत्रज्ञान अवगत करणे आवश्यक आहे. यापूर्वी बाहेरगावी शिकणार्‍या मुलांना महाविद्यालयीन खर्चासाठी अथवा इतर कामासाठी बँकेतून पैसे पाठवल्यास पालकांना पैसे आकारले जात. हा त्रास ग्रीन लिमीट कार्डमुळे आता कमी झाला असून स्टेट बँकेत खाते असलेल्या ग्राहकांना ही सुविधा मिळणार आहे.
यापूर्वी खात्यातून पैसे ट्रान्सफर करण्यासाठी एका व्यवहारावर 20 ते 25 रुपये आकारले जात होते; मात्र या ग्रीन कार्डमुळे तो भुर्दंड देखील कमी झाला आहे. केवळ एकदाच कार्ड घेताना 20 रुपये सर्व्हिसचार्ज आकारला जाणार आहे. त्यानंतर पैसे ट्रान्सफर करतेवेळी कुठलेच चार्ज आकारले जाणार नाही. एकूणच ही सुविधा उद्योजक, व्यापारी व पालक यांना फायद्याची ठरत असून तिला मोठी पसंती मिळत आहे.
पैसे ट्रान्सफरसाठी 24 तास सेवा
यासुविधेत दोन्हींकडे स्टेट बँकेचे खाते असणे गरजेचे आहे. आता स्टेट बँकेने सेल्फ सर्व्हिस केअर (एसएसके) हे मशीन 24 तास ग्राहकांच्या सेवेत उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे कोणत्याहीक्षणी पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे बाहेरगावी शिक्षण घेणार्‍या, नोकरी करणार्‍या मुलांना आवश्यकतेनुसार पैशांची गरज पूर्ण होणार आहे.
800 जणांनी घेतले ग्रीन कार्ड
स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत 300 तर जिल्हापेठ शाखेत 500 जणांना ग्रीन लिमीट कार्ड देण्यात आले आहे. या सुविधेसोबतच एटीएम कार्ड असलेल्या ग्राहकांना जीसीसी मशीनद्वारे कुठल्याही खात्यात पैसे ट्रान्सफर करता येणार आहेत. सध्या स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतच ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रोजचा व्यवहार करणार्‍या व्यावसायिक व उद्योजकांनीही या कार्डला पसंती दिली आहे.
कार्ड घेणार्‍यांची संख्या वाढली
सीडीएम, जीसीसी, एसएसके हे मशीन 24 तास ग्राहकांना उपलब्ध करून दिल्यामुळे ग्रीन लिमीट कार्ड घेणार्‍यांची मागणी वाढली आहे. या कार्डमुळे व्यवहार करताना कुठलेच चार्ज आकारले जाणार नाहीत. कार्ड नसलेल्या ग्राहकांकडून अतिरिक्त 20 ते 25 रुपये सर्व्हिस चार्ज कापला जातो. एम.वाय.शेख, मुख्य प्रबंधक, स्टेट बँक