आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयुक्त बोर्डे यांची तडकाफडकी बदली, नाशिकचे जीवन सोनवणे महापालिकेचे नवे आयुक्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - केवळ१५ दिवसांपूर्वीच महानगर पालिका आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारलेल्या किशोर बोर्डे यांची शनिवारी नाशिकला तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांंच्या जागी नाशिक पालिकेचे अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे यांची जळगाव महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बदलीचे आदेश शासनाच्या संकेतस्थळावर पडले, त्या वेळी बोर्डे रविवारची सुटी घालवण्यासाठी नाशिकला आपल्या घराकडे निघाले होते. दरम्यान, आमदार एकनाथ खडसे मंत्रिपदावरून पायउतार होताच सत्ताधारी खाविआने सोयीच्या अधिकाऱ्याला मनपात आणले, असाही कयास लावला जात आहे. मात्र, या बदलीने दोन्ही आयुक्तांची खांदेपालट झाली.
१५ दिवसांपूर्वी पदभार स्वीकारल्यानंतर बोर्डे यांनी शहरातील अतिक्रमण, व्यापारी संकुलात एकटेच जाऊन पाहणी केली होती. तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांच्या कार्यकाळात राबवल्या गेलेल्या अतिक्रमण मोहिमेचाही त्यांनी आढावा घेतला होता. तसेच सुभाष चौकातील जागा हॉकर्सला पुन्हा दिली जाणार नाही, हा निर्णयही त्यांनी घेतला होता. या शिवाय जळगाव महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी मालमत्ता कराची वसुली, नगररचना विभागाच्या परवानग्या या विषयांवर भर देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान, शनिवारी सायंकाळी वाजेच्या सुमारास त्यांच्या बदलीची ऑर्डर शासनाच्या संकेतस्थळावर झळकली.

योगायोगाने बोर्डे नाशकातच
दरम्यान,शनिवारी आयुक्त बोर्डे हे महापालिकेत आले नाहीत. दुपारपर्यंत ते घरीच होते. महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी कामानिमित्त घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. बोर्डे यांचे कुटंुब नाशिकमध्येच राहते. त्यामुळे ते रविवारी कुटंुबीयंाना भेटण्यासाठी जाणार होते. दुपारी कामायनी एक्स्प्रेसने प्रवास करून ते जळगावहून नाशिकला गेले. दरम्यान ते नाशिक पोहोचण्याच्या अाधीच त्यांच्या बदलीची ऑर्डर सोशल मीडियातून फिरू लागली. आश्चर्यकारक बदली झाल्यामुळे जळगावातील नगरसेवक, महापालिकेचे अधिकारी, पत्रकारांनी बोर्डे यांना फोन करून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी ते रेल्वेच्या प्रवासातच होते. सुटीनिमित्ताने त्यांचे नाशिकला जाणे आणि नाशिकलाच बदली होणे हा योगायोग साधला गेला. रात्री वाजेच्या सुमारास ते नाशिकच्या घरी पोहोचले होते.

पूर्वीपासूनच सोनवणेंच्या नावाची चर्चा : कापडणीसयांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर सोनवणे येणार, अशी चर्चा होती. त्यांचे नाव जवळपास नक्की झाल्याचीही माहिती मंत्रालयातून आली होती. मात्र, ऐनवेळी मालेगाव येथून बोर्डे यांची जळगावात बदली झाली. मात्र बोर्डे यांचे बस्तान बसण्यापूर्वीच सोनवणे यांची जळगावात वर्णी लागल्याने या मागे राजकीय सोय असल्याची अधिकारी-कर्मचारी वर्तुळातही चर्चा सुरू होती. सोनवणे हे मूळचे बोरविहीर (ता. धुळे) येथील रहिवाशी आहे. तसेच यापूर्वी ते धुळे मनपात आयुक्त होते.

अायुक्तांच्या बदलीमागे महाजन असल्याची चर्चा : नाशिकचेपालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक मनपातून साेनवणे यांना जळगाव मनपात अाणले अाहे. भविष्यात जळगावचे पालकमंत्रीपद स्वीकारण्यासाठी त्यांनी मर्जीतील अधिकारी बसवण्याचे काम हाती घेतले अाहे. त्यातील पहिला अंक म्हणून अायुक्तांची १५ दिवसातच बदली करवून घेतल्याची चर्चा शनिवारी हाेती.

मावळते आयुक्त बोर्डे यांच्याशी ‘दिव्य मराठी’ने संवाद साधला. आपण १५ दिवसांपूर्वीच पदभार घेतला होता. अजून जळगाव शहर जाणून घेत होतो. दरम्यानच्या काळात सत्ताधारी किंवा विरोधी गटातील नगरसेवक, आमदार, खासदार यांच्याशी जास्त बोलणेही झाले नव्हते. पण, तरीही आपली बदली राजकारणातूनच झाली असावी, अशी शक्यता आहे. ‘कोणाला तरी मी आवडलो नसेन’ असा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान, बोर्डे पदभार सोडण्यासाठी सोमवारी जळगावात येणार अाहेत. तर सोमवारी अथवा मंगळवारी पदाची सूत्रे स्वीकारण्यासाठी जळगावात येईल, असे नवनियुक्त आयुक्त सोनवणे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...