आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Transmission Losses In Bhusaval Increased By Four Percent

दिव्याखाली अंधार, वीज गळती चार टक्क्यांनी वाढली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- राज्याला सरासरी 1000 मेगाव्ॉट वीज पुरवणार्‍या भुसावळात ऐन पावसाळ्यात नागरिकांना भारनियमन सहन करावे लागत आहे. 42 टक्क्यांवर असलेली वीज गळती आता चार टक्क्यांनी वाढून 46 टक्के झाली आहे. दोन महिन्याच्या अंतराने वाढलेली ही गळती पाहता भारनियमन आटोक्यात येणे अशक्य आहे.

वीज वितरण कंपनीची शहरातील उपकरणे तब्बल 35 ते 40 वर्षे जुनी आहेत. जीर्ण आणि तकलादू यंत्रणेमुळे सातत्याने बिघाड, वीज गळतीचे प्रमाण वाढले आहे. दोन महिन्यापूर्वी शहरातील वीज गळती सरासरी 42 टक्के होती. ऑगस्टच्या आढाव्यानुसार यामध्ये आता चार टक्के वाढ झाली आहे. यामुळे शहरातील एक्स्प्रेस-2 फीडरवरील भागात भारनियमन सुरू झाले आहे. दरम्यान, वीज वितरण कंपनीच्या स्थापनेपासून शहरात स्वतंत्र सबस्टेशन नाही. साकेगाव, चोरवड, दीपनगर आदी ठिकाणांहून विजचे वहन होते. या प्रमुख कारणामुळेच वीज गळती वाढते. मध्यंतरी भुसावळसाठी 33 बाय 11 केव्हीच्या दोन सबस्टेशनला मंजुरी मिळाली. केंद्र शासनाच्या आरएडीआरपी योजनेतून शहरातील अनुक्रमे गजानन महाराजनगर आणि नाहाटा महाविद्यालयाच्या मागील बाजूस या सबस्टेशनची उभारणी होईल.

हे आहेत उपाय
वीज वितरण कंपनीच्या वितरण हानी (गळती) बरोबरच वीजचोरी, मीटरमध्ये हेराफेरी, तारांवर आकडे टाकणे आदी प्रकार शहरात वाढले आहेत. उच्च्भ्रू वस्तीमधील काही धनदांडग्यांनी वीजचोरी केल्याचे प्रकार यापूर्वी आढळले होते. गळती आणि चोरी रोखण्यासाठी प्रयत्न केले तरच शहरातील भारनियमन कमी होईल. अन्यथा पावसाळ्याप्रमाणेच हिवाळ्यातही भारनियमन सहन करावे लागेल.

थातूरमातूर कारवाई
शहरातील बहुतांश भागात वीज खांबांवर आकडे टाकून दिवसा वीजचोरी होते. अनेक मोठय़ा प्रतिष्ठानांमध्ये मीटरमध्ये छेडखानी होते. वीज वितरण कंपनी मात्र चोरांवर धडक कारवाई करत नाही. सहा महिन्यांत कोणत्याही पथकाने शहरात समाधानकारक कारवाई केलेली नाही. यामुळेच वीजगळतीचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढले आहे.