आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिक्षक चळवळीतील योगदान पाहूनच पारदर्शकपणे हाेणार उमेदवाराची निवड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जुलै महिन्यात होऊ घातलेल्या नाशिक विभाग शिक्षक आमदार निवडणुकीसाठी शिक्षक लोकशाही आघाडीतर्फे (टीडीएफ) इच्छुक उमेदवारांची चढाओढ रविवारी सरदार पटेल लेवा भवनात झालेल्या जिल्हा मेळाव्यात दिसून आली. याप्रसंगी शिक्षक चळवळीतील योगदान पाहून पारदर्शक पद्धतीने टीडीएफ उमेदवाराची निवड केली जाईल, अशी घोषणा टीडीएफचे कार्याध्यक्ष फिरोज बादशहाे यांनी केली. 


नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातील विद्यमान अामदार अपूर्व हिरे असून जुलै महिन्यात नव्या शिक्षक आमदाराची निवड केली जाणार आहे. त्यासाठी आतापासूनच तयारी केली जात आहे. महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीतर्फे माजी आमदारांच्या पुढाकारातून संदीप बेडसे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र, हा उमेदवार शिक्षक संघटनेशी कार्यरत नसल्याने यास नाशिक विभागातून विरोध वाढला आहे. यामुळे आघाडीतर्फे खान्देशात मेळावे घेतले जात आहेत. या अंतर्गत शिक्षकांचे मत जाणून घेण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी फिरोज बादशहाे यांनी सांगितले की, मागील निवडणुकीतील चुका या वेळी करू नका. आता पैशांऐवजी शिक्षक शक्तीच चालेल. आजवर आपले उमेदवार निवडून देऊनही त्यांची शिक्षकांसाठी काम करण्याची मानसिकता का बदलते, याचा अभ्यास करा. शिक्षक चळवळीत योगदान आहे, अशाच उमेदवाराची निवड केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. 


खान्देशातून भिरुडांना प्रतिसाद 
विभागातील हा सर्वात मोठा मेळावा होता, यास शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. जिल्ह्याचे उमेदवार एस. डी. भिरुड यांनीही मनोगतात उमेदवार निवडीच्या मॅनेज कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. निवडून आलेल्यांनी आजवर आमदारांनी शिक्षकांचा एकही प्रश्न विधानसभेत मांडला नाही. पाकीट पोहचवून निघून गेलेल्यांना आता शिक्षक संधी देतील का? असा प्रश्न उपस्थित करीत आपल्या उमेदवारीचे समर्थन केले. 


बेडसेंमध्ये काय पाहिले? इच्छुकांचा सवाल 
आघाडीतर्फे १० पैकी ९ उमेदवार उपस्थित होते. नाशिकचे इच्छुक उमेदवार कचेश्वर बारसे यांनी उमेदवार निवडीत समितीने लॉबिंग करू नये, असा सल्ला देत, ती होत असेल तर ती फोडायची जबाबदारी समितीची आहे. समितीने संदीप बेडसे यांच्यात काय पाहिले, ते सिद्ध करावे. यापुढे ‘मनी विथ मसल’ असा उमेदवार आला, तर आश्चर्य करू नका असे सांगत आपल्या कार्याचे समर्थन केले. यांच्यासह आर. डी. निकम (नाशिक), एस. डी. भिरुड, निशांत रंधे (शिरपूर), राजेंद्र लांडे, चांगदेव कडू (नगर), एस. बी. देशमुख , विठ्ठलराव पानसरे ( संगमनेर) यांनी उमेदवारीसंदर्भात मते मांडली. उमेदवार हा लोकशाहीपद्धतीने द्यावा, आता धनशक्तीविरुद्ध शिक्षकशक्ती असा लढा आहे, यामुळे आपला विजय निश्चित असल्याचे जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष यू. यू. पाटील यांनी सांगितले. या वेळी अण्णा शिंदे, सी. सी. वाणी, तुकाराम बोरोले, ए. एच. पटेल उपस्थित होते. नंदू पाटील यांनी सूत्रसंचालन केले. अरुण सपकाळे यांनी आभार मानले. एस. के. पाटील, शंकर वाणी, सुहास चौधरी, हेमंत चौधरी, अजय पाटील, मुकेश बोरोले, गजानन किनगे यांनी नियोजन केले. 

बातम्या आणखी आहेत...