आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Transport Registration News In Marathi, RTO, Divya Marathi, Jalgaon

वाहन नोंदणीचा कायदा ना आरटीओ पाळत, ना वितरक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - मोटारसायकल खरेदी केली जाते त्याच दिवशी तिची आरटीओ कार्यालयात नोंदणी करणे आवश्यक आहे. याची संपूर्ण जबाबदारी वितरकांची असते; परंतु आरटीओ नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात येत आहे. खरेदी केल्यानंतर नोंदणी न केलेली व नंबरप्लेट नसलेली अनेक वाहने रस्त्यांवर बिनधास्तपणे फिरताना दिसून येत आहेत. बहुतांश वाहनधारक दोन-तीन महिने नोंदणीच करत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्था धोक्यात आली आहे; परंतु या प्रकारांकडे वाहतूक शाखा गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसते.


गेल्या महिनाभरात शहरात सोनसाखळीचोरीच्या पाच घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये चोरट्यांनी वापरलेल्या दुचाकी नंबरप्लेट नसलेल्या आहेत. त्यामुळे चोरट्यांना पकडणेही पोलिसांसाठी कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आता वाहतूक पोलिस विनानंबर व चित्रविचित्र नंबरप्लेट असलेल्या दुचाकींवर कारवाई करीत आहेत. मुळात दुचाकी खरेदी करतानाच तिची नोंदणी करण्याचा कायदा आहे. त्यामुळे नंबरप्लेट नसलेल्या दुचाकी रस्त्यांवर धावण्याचा प्रश्‍नच निर्माण होणार नाही; परंतु वितरक, आरटीओ अधिकारी आणि ग्राहक या तिघांच्याही असमन्वयामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.


सात दिवसांची मुदत
फायनान्सच्या प्रकरणात अनेक वेळा चेक वेळेवर मिळत नाही. तरीदेखील मोटारसायकलींची विक्री केली जाते. तसेच पैसे पूर्ण मिळालेले नसल्यामुळे संबंधित वाहनाची नोंदणी करण्यास विलंब केला जातो. अशा स्थितीत ग्राहक मात्र दुचाकी घेऊन वापरणे सुरू करतो. काही वेळा सात दिवसांची मुदत देण्यात येते; परंतु या मुदतीतही नोंदणी करण्यात येत नाही.


काय म्हणतो कायदा?
कोणतीही मोटारसायकल खरेदी केल्यास तिच्या वितरणावेळीच आरटीओ कार्यालयाच्या कर्मचार्‍याने मोटार वाहन कायद्यानुसार तिची नोंदणी करणे बंधनकारक आहे. तसेच नंबरप्लेट नसलेली मोटारसायकल आढळल्यास संबंधित वाहनधारकावर कारवाई करण्याची तरतूद आहे. त्यासाठी 100 रुपये दंड आकारला जात


प्रसंगी वितरकांचे सर्टिफिकेट रद्द करू
वितरकांनी वाहनाची विक्री करतानाच नोंदणी केली पाहिजे. काही दुचाकी विक्री करताना पूर्ण पैसे मिळाले नसल्यास वितरक नोंदणी न करताच वाहनांचा ताबा देतात. त्यामुळेच असे प्रकार वाढले आहेत. तथापि, यापुढे असे प्रकार निदर्शनास आल्यास वितरकांचे ट्रेड सर्टिफिकेट काही दिवसांसाठी रद्द करण्याची कारवाई केली जाईल. एस.एस.वारे, उपविभागीय परिवहन अधिकारी


आरटीओचे कर्मचारी उपलब्ध होत नाहीत
वाहनांची नोंदणी विक्री केल्याच्या दिवशी करण्याचा कायदा आहे; परंतु आरटीओ कार्यालयाकडून नोंदणी करणारे कर्मचारी उपलब्ध होत नाहीत. याशिवाय ग्राहकही मुहूर्त, चॉइस नंबरसाठी खरेदी आणि नोंदणीत अंतर ठेवतात. ऑटोमोबाइल असोसिएशन आणि आरटीओ अधिकार्‍यांशी चर्चा करून याबाबत नियमाप्रमाणे नोंदणी करून देण्यास काही वितरक तयार आहेत. मात्र, त्यांच्यात समन्वय झाला पाहिजे. किरण बच्छाव, संचालक, सातपुडा ऑटोमोबाइल्स तथा ऑटोमोबाइल असोसिएशनचे अध्यक्ष


आरटीओकडूनही कारवाई नाही
वितरकांकडून मोटारसायकल विक्री केल्याच्या दिवशी नोंदणी करून घेण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. याशिवाय वितरक किंवा ग्राहकांकडून विलंब होत असल्यास कारवाई न करताच उशिराने नोंदणी करून देतात. परिणामी, वितरक व ग्राहक मनाप्रमाणे नोंदणी करतात. मात्र, अशा प्रकरणांत आरटीओ कार्यालयातर्फे आतापर्यंत एकाही वितरकावर कारवाई झालेली नाही.


ग्राहकांची चूक अशी
अनेक वेळा ग्राहक चॉइस नंबरचा हट्ट धरतात. त्यामुळे थेट आरटीओचे नियम मोडत त्याची उशिरा नोंदणी करतात. याशिवाय दुचाकी खरेदीचा मुहूर्त साधण्यासाठीही खरेदी करण्याची घाई करतात. मात्र, नंतर नोंदणी करण्याचे विसरतात. तसेच क्रमांक घेतल्यानंतर विशिष्ट प्रकारचे चिन्ह वा नाव तयार करण्यासाठी विचित्र नंबरप्लेट बनवतात.