आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव- लग्नसराई आणि शाळांना उन्हाळी सुटी लागल्यामुळे गावाला जाणार्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. बहुतांश प्रवासी एसटी बसऐवजी खासगी बसला पसंती देत आहेत. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सच्या बसेसमध्ये गर्दी वाढल्याने आठवडाभराचे बुकिंग फुल्ल झाले आहे. तथापि, प्रति तिकिटामागे 100 रुपयांनी भाडेवाढ करण्यात आली आहे.
शहरातून रात्री मुंबई, पुणे, नागपूर, इंदूर, सुरत, अहमदाबाद आदी शहरांकडे रात्री खासगी बस जातात. रेल्वे स्थानक, क्रीडा संकुल, गोलाणी मार्केट, तसेच अजिंठा चौफुली या ठिकाणी या बसेस उभ्या असतात. सध्या लग्नसराई आणि शाळांना सुटी असल्यामुळे प्रवाशांची बाहेरगावी जाणार्यांची गर्दी वाढते आहे. रेल्वेची बुकिंग महिनाभरापासून पॅक आहेत. तसेच खाजगी ट्रॅव्हल्सचीही आठवडाभरापासून आगाऊ बुकिंग करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या या वाहनांची चलती आहे.
एसटी महामंडळाच्या बसपेक्षा खाजगी बसमधून अधिक आरामदायी प्रवास होत असल्यामुळे लांबच्या प्रवासासाठी एसटी बसऐवजी खाजगी बसला अधिक पसंती दिली जाते आहे. एरवी प्रवासी शोधण्याची वेळ येणार्या या बसेस सध्या भरून जात आहेत. सध्या शहर व इतर ठिकाणाहून येणार्या 35 ते 40 बसेस रोज रात्री येथून जात आहेत. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी खासगी बस वाहतूकदारांकडून अधिकाधिक सुविधांचे आमिष देण्यात येत आहे. पूर्वी केवळ बसून प्रवासाची सोय असणार्या या गाड्यांमध्ये आता रेल्वेप्रमाणे झोपून जाण्याची सोय आहे. मात्र, त्यासाठी नेहमीच्या भाड्यापेक्षा अतिरिक्त भाडे आकारले जाते.
सध्या या बसेसचा सीझन जोरात असल्याचे चित्र आहे. त्यासाठी दोन ते तीन दिवस अगोदर नोंदणी करावी लागत आहे. त्या तुलनेत एसटी महामंडळानेही लांब पल्ल्यांच्या बसेसमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे प्रवाशांना आकर्षित करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. त्यामुळे काही खासगी वाहनांमध्ये वातानुकूलित सुविधा उपलब्ध करून दिली आहे. येथून पुण्यासाठी 35 बसेस, मुंबई पाच, इंदूर आठ, अहमदाबाद पाच, सुरत पाच, नागपूर चार बसेस निघतात. भुसावळकडून येणार्या बसेसही येथे थांबतात.
सीझनप्रमाणे होते भाडेवाढ- दिवाळीनंतर जानेवारी महिना वगळता फारशा विवाह तिथी नव्हत्या. मार्च-एप्रिलचा काळ परीक्षांचा असल्यामुळे प्रवाशांची संख्या कमी होते. त्यावेळी पुणे-मुंबईसाठी 300 ते 350 रुपये भाडे आकारण्यात येते. परंतु आता प्रवासी वाढल्याने महिनाभरापासून भाडेवाढ करण्यात आली आहे. ती 15 जूनपर्यंत कायम राहणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.