आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Travels Organization,latest News In Divya Marathi

ट्रॅव्हल्स संघटनेची सक्ती प्रवाशांना नाहक भुर्दंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जिल्हा ट्रॅव्हल्स मालजळगाव क ऑपरेटर असोसिएशनने पुणे, मुंबईसाठी ठरवून दिलेल्या भाड्यापेक्षा कमी भाडे आकारणार्‍या वाहतूकदाराला भाडेवाढ करण्याची अप्रत्यक्षपणे सक्ती केली आहे. त्यामुळे पुणे, मुंबईला जाण्याचे भाडे येण्याच्या भाड्यापेक्षा अधिक आहे. संघटनेच्या या अप्रत्यक्ष सक्तीमुळे मात्र जळगावच्या प्रवाशांना नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे.
ट्रॅव्हल्स मालक संघटनेच्या अध्यक्षांशी थेट संवाद
संघटना समस्या सोडविण्यासाठी पर्याय म्हणून बघितले जाते
संघटना कोणतीही असो, ती आपल्या सदस्यांच्या समस्या सोडवण्यासाठी असते. संघटनेने चुकीच्या बाबतीत सक्ती केली तर त्याचा नाहक भुर्दंड इतरांना सोसावा लागतो. तीच अवस्था जळगावकरांची झाली आहे. खासगी ट्रॅव्हल्स संघटनेने ठरवून दिलेले पुणे, मुंबईला जाण्याचे भाडे येण्याच्या भाड्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे संघटना जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आहे की वाढविण्यासाठी आहे. हा प्रo्न जळगावकरांना भेडसावतो आहे. भाड्यातील ही तफावत संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी तत्काळ दूर करावी अशी प्रवाशांची अपेक्षा आहे.
एसटीची दिवसेंदिवस होणारी भाडेवाढ आणि रेल्वेतील प्रचंड गर्दी याला पर्याय म्हणून प्रवासी खासगी बसचा आधार घेतात. त्याचाच गैरफायदा घेत खासगी बस वाहतूकदारांनी आपला मनमानी कारभार सुरू केला आहे. त्यांच्या भाड्यावर कोणाचेच नियंत्रण किंवा बंधन नसल्याने एकाच गावाला जाणार्‍या आणि येणार्‍या गाडीच्या भाड्यात शंभर ते दीडशे रुपये तफावत दिसून येत असून अव्वाच्या सव्वा भाडे आकारण्याचे प्रकार बिनदिक्कतपणे सुरू आहेत.प्रवाशांना मात्र नाहक आर्थिक झळ सोसावी लागत आहे.
जाण्यासाठी जादा आणि परतण्यासाठी आकारले जाते कमी भाडे
प्रश्‍न: एखाद्या गावाला जाताना भाडे जास्त येताना कमी कसे ? शेखर झांबरे : आम्हाला मुंबई, पुण्यासाठी कमीत कमी 24 हजार 500 रुपये खर्च येतो. संघटनेने जातानाचे भाडे सर्वानुमते 650 रुपये ठरवून दिले आहे. येताना अनेक वेळा प्रवासी मिळत नाही. परतीसाठी आम्ही ठेका दिलेला असतो. त्यामुळे कमीत कमी परतीच्या फेरीत डिझेल, देखभाल हा खर्च निघाला पाहिजे हा हेतू असतो.
प्रश्‍न: दोन्ही बाजूंनी गाड्या प्रवाशांनी भरलेल्या असतात. मग भाड्यात तफावत का? झांबरे : नाही, यात सत्यता नाही. फक्त शनिवार, रविवार आणि सुटीचे दिवस हे दोनच दिवस गाड्यांना गर्दी असते. इतर दिवशी गाड्या रिकाम्याच असतात.
प्रश्‍न: ठेकेदाराला कमिशन देऊनही कमी भाड्यात कसे परवडते ? झांबरे : परतीच्या फेरीसाठी आम्ही कोणत्याही ठेकेदाराला कमिशन देत नाही. एसी गाडीचे तीस सीटांसाठी 14 हजार आणि नॉन एसी गाडीसाठी 12 हजार रुपये आम्ही रोख घेतो. उलट जळगावहून जाताना जी एजन्सी दुसर्‍या ट्रॅव्हल्सला प्रवासी देते त्यांना एका प्रवाशासाठी 50 रुपये कमिशन द्यावे लागते.
प्रश्‍न: एका ट्रॅव्हल्स मालकाने संघटना भाड्यासाठी सक्ती करते असे सांगितले झांबरे : यात सत्यता नाही. कारण आम्ही फक्त ठरविले आहे, जाताना भाडे किती असले पाहिजे. यात कोणताही दंड आकारला जाणार नाही. तुम्हाला चुकीची माहिती दिली गेली आहे. आम्ही सुरुवातीला दोन ते तीन वेळा त्याला समजावून सांगू, नाही ऐकले तर इतर कोणतीही ट्रॅव्हल्स एजन्सी त्याला प्रवासी पुरवण्याचे काम करणार नाही.
प्रश्‍न: हे सांगून तुम्ही अप्रत्यक्ष सक्तीच केली आहे. झांबरे : नाही याला सक्ती म्हणता येणार नाही. कारण आम्हाला जाताना जवळपास 15 टक्के कर भरावे लागतात. शिवाय कमिशनही द्यावे लागते. आम्हाला लागलेला खर्च वसूल होऊन थोडाफार फायदा झाला तरच हा धंदा परवडेल.
प्रश्‍न: भाडे कमी होऊ शकते का ? झांबरे : आम्ही पंधरा दिवसांपूर्वी संघटनेची स्थापना केली आहे. माझ्या एकट्याच्या निर्णयाला महत्त्व नाही. त्यामुळे सर्वांनी मिळून भाडे कमी करण्यासंदर्भात ठरविले तर भाडे कमी होऊ शकते.
ट्रॅव्हल्स संघटनेची सक्ती प्रवाशांना नाहक भुर्दंड