आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाकूडतोड्यांपुढे महापालिका हतबल!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - ‘आता खैर नाही; लाकूडतोड्यांना लगाम लावण्यासाठी वृक्षांची कत्तल झाली तर संबंधितांवर गुन्हे दाखल करू’ अशी ओरड करणारी महापालिका प्रत्यक्षात काहीच करत नसल्याचे लक्षात आल्याने शहरातील लाकूडतोड्यांनी कु-हाडीला धार लावली आहे. शहरातील मेहरूण तलावाकाठी असलेल्या श्रीकृष्ण लॉनमध्ये सागासह इतर झाडांची कत्तल करण्यात आली आहे. महापालिकेने मात्र आपल्याला याबाबत काहीही माहीत नसल्याचे सांगून नेहमीप्रमाणे कानावर हात ठेवले आहेत. दरम्यान, वृक्षतोडीची परवानगी नसल्याने महापालिका मात्र पुन्हा पाहणी, चौकशीचा खेळ खेळण्यासाठी सज्ज आहे.
शहरातील गंभीर समस्या बनलेल्या वृक्षतोडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी महानगरपालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. याबाबत दखल घेत जिल्हाधिका-यांनी महिनाभरापूर्वी महापालिका आयुक्तांना वृक्षसंवर्धनाचे लेखी डोस पाजले होते; मात्र महापालिका प्रशासनाची कमजोरी माहीत असल्याने शहरात सर्रास वृक्षतोड करण्यात येत आहे. शहरात खुलेआम झाडांची कत्तल होत असताना महापालिका प्रशासन मात्र पाहणी, चौकशी, नोटीस यापलीकडे जात नसल्याने वृक्षांवर कु-हाडीचे घाव सुरूच आहेत.
दरम्यान, शहरातील मेहरूण तलावाकाठी असलेल्या श्रीकृष्ण लॉन येथे सागाच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे; मात्र त्यातील काही झाडांची छाटणी करण्यात आली आहे. सागाच्या झाडासह बांधांवरील इतर दोन झाडांचीही तोड करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेचा वृक्षतोड करणा-यांवर धाक नसल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.

तक्रार अर्जाची चौकशी सुरू
वृक्षतोडीबाबत महापालिकेने दिलेल्या तक्रार अर्जाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. पालिकेची परवानगी न घेता वृक्षतोड असली तर त्यावर कारवाई करण्याचा अधिकार महापालिकेला आहे. मात्र, त्यांनी तसे न करता आम्हाला फक्त तक्रार अर्ज दिला आहे. त्या तक्रार अर्जाची चौकशी सुरु केली आहे. चौकशीअंती दोषी आढळणाºयावर गुन्हे दाखल करू.
प्रकाश खांडेकर, पोलिस निरीक्षक, तालुका पोलिस स्टेशन

अद्याप गुन्हा नाही
कृषितंत्र महाविद्यालयातील वृक्षतोडीबाबत गुन्हे दाखल करण्यासाठी मनपाने पोलिस विभागाला पत्र दिले आहे; मात्र शनिवारी रात्री उशिरापर्यंत तालुका आणि एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल नव्हता.
पाहणी करणार
श्रीकृष्ण लॉनमध्ये वृक्षतोड झाल्याची माहिती मिळाली नाही. झाडे तोडताना कुणाची परवानगी घेतली व किती झाडे तोडली ? याबाबत तेथे जाऊन पाहणी करून पुढील कारवाई करू.
दिलीप सूर्यवंशी, पर्यावरण विभागप्रमुख