आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षतोडप्रकरणी जिल्हाधिकारी संतापले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - शहरात रोजरासपणे सुरू असलेल्या वृक्षतोडीला आळा घालण्यास महानगरपालिका प्रशासनाला सपशेल अपयश आले आहे. सातत्याने सुरू असलेल्या वृक्षतोडीची जिल्हाधिका-यांनी गंभीर दखल घेतली आहे. वेळोवेळी सूचना देऊनदेखील कारवाई होत नसल्याने जिल्हाधिका-यांनी बुधवारी महापालिका आयुक्तांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून कारवाईबाबत विचारणा केली. आतापर्यंत केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. दरम्यान, शहरातील वृक्षतोडीबाबत निर्णय घेण्यासाठी सोमवारी जिल्हाधिका-यांनी संयुक्त बैठक बोलविली आहे.
वृक्षतोड गंभीर बाब - शहरात सातत्याने होणारी वृक्षतोड ही गंभीर बाब आहे. यापूर्वी वृक्षतोडीबाबत महापालिका आयुक्तांना पत्र दिले होते. महापालिका प्रशासनाकडून पाहिजे तशी कारवाई होत नसल्याने त्यांना पुन्हा सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या सोमवारी यासंदर्भात बैठक बोलविण्यात आली आहे. - ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी.
* वृक्षतोडीसंदर्भात मी सूचना दिल्या आहेत. मनपाने संबंधित पोलिस ठाण्यांकडे तक्रार अर्ज दिले आहेत. सविस्तर फिर्याद दिलेली नाही, त्या अर्जाची चौकशी करूनच दोषींवर कारवाई करण्यात येईल. - प्रकाश मुत्याळ, पोलिस अधीक्षक
* वृक्ष तोडल्यास कारवाई करण्याचे अधिकार मनपाला आहेत. यापूर्वी वृक्ष तोडून त्याची चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. मात्र, मनपाने विना परवानगी वृक्ष तोडल्याचा तक्रार अर्ज दिल्याने या प्रकरणात गुन्हा नोंदवण्याची तरतूद भारतीय दंड विधायकात नाही. - प्रदीप ठाकूर, सहायक पोलिस निरीक्षक, एमआयडीसी ठाणे
* तक्रार अर्जावरून कृषितंत्र विद्यालयातील वृक्षतोडीचा पंचनामा केला आहे. कागदपत्रांचा अभ्यास केल्यावर निर्णय घेण्यात येईल. - प्रकाश खांडेकर, पोलिस निरीक्षक, तालुका पोलिस ठाणे
* वृक्षतोडसंदर्भात कारवाईचे महापालिकेस काय अधिकार आहेत याबाबत माहिती आपल्याकडे उपलब्ध नाही. याबाबत मनपा अधिनियमांतर्गत किंवा अन्य कोणती कारवाई करता येऊ शकते काय? याची माहिती शासनस्तरावरुन मागविणार आहे. - दिलीप सूर्यवंशी, वृक्ष अधिकारी महापालिका
सोमवारी होणार संयुक्त बैठक - शहरातील झाडांवर पडणारे कु-हाडीचे घाव थांबविण्यात महापालिकेला यश आलेले नाही. अद्याप एकाही प्रकरणात कारवाई करण्यात आलेली नसल्याने शहरातील झाडांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. महापालिकेला आव्हान देत जिल्हा बॅँक प्रशासनाने अशोक वृक्षाची कत्तल केली होती. शहरात वृक्षतोडीची मालिका सुरू असताना महापालिका प्रशासन मात्र काहीच करत नसल्याने जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूूरकर यांनी महापालिका आयुक्त प्रकाश बोखड यांच्याशी संपर्क साधून वृक्षतोड करणा-यांवर कारवाई का होत नाही? याबाबत विचारणा केली. या वेळी वृक्षतोडीसंदर्भात केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेशदेखील त्यांनी दिले. वृक्षतोड थांबविण्यासाठी महापालिका, जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग, वनविभाग, पर्यावरणसंबंधित काम करणा-या खाजगी संस्था यांची संयुक्त बैठक येत्या सोमवारी आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीत तरी ठोस निर्णय व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
महापालिका कर्मचा-यांचा फेरफटका - वृक्षतोडीच्या कारवाईसाठी महापालिकेतून बाहेर पडलेल्या कर्मचा-यांनी बुधवारी जिल्हा मध्यवर्ती बँकेत जाऊन तोडलेल्या झाडांपुढे हजेरी लावून जिल्हा बँक प्रशासनाला विचारणा न करताच पहाणीचा शासकीय दौरा आटोपता घेतला. बॅँकेचे एमडी गावाला गेले असल्याची माहिती मिळाल्याने महापालिकेचे कर्मचारी बॅँकेच्या गेटवरूनच परत फिरले. दरम्यान, पाच दिवसानंतर श्रीकृष्ण लॉनमध्ये जाण्याची सवड मिळाल्यानंतरही कर्मचारी बुधवारीदेखील घटनास्थळी पोहचलेच नाहीत.
‘आर्किड’तर्फे जिल्हाधिका-यांना निवेदन - वृक्षतोडीसंदर्भात मनपाकडून दखल घेतली जात नाही, गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पोलिस आणि मनपा यांच्यात समन्वय नाही, यात जिल्हाधिका-यांनी लक्ष देऊन संयुक्त बैठक घेण्याची मागणी केली. मनपाच्या दुर्लक्षामुळे न्यायालयात धाव घेण्यापलीकडे कोणताही पर्याय नाही, मात्र तत्काळ वृक्षतोड थांबावी यासाठी कारवाईबाबत मनपाला आदेश देण्याची मागणी आर्किड नेचरतर्फे दीपक तांबोळी, आर.ए. पाटील, शशिकांत नेहेते, शिवलाल बारी यांनी निवेदनाद्वारे केली.