आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वृक्षतोडीचे सत्र सुरूच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी राखी पौर्णिमेला झाडांना राखी बांधून त्यांचे संरक्षण करण्याचा संदेश दिला. मात्र, दुसरीकडे तार ऑफीस रोडवर एक फांदी कापण्याच्या नावाखाली कडू बदामाच्या मोठय़ा झाडाच्या बुंध्यावर कुर्‍हाडींचे घाव घातले गेले. प्रांताधिकारी आणि तहसीलदार कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर हा प्रकार घडला. परिसरातील वृक्षप्रेमींनी या दोन्ही अधिकार्‍यांना झाड वाचवण्याची विनंती केली. मात्र, रक्षाबंधनाची सुटी असल्याने शुक्रवारी अर्ज द्या, त्यानंतर पंचनामा करू, अशी उत्तरे देण्यात आली.

तार ऑफीस रोडवरून तालुका शेतकरी संघाच्या वाहनांची वर्दळ सुरू असते. या वर्दळीला एका झाडाच्या फांदीचा अडथळा येतो. यासंदर्भात शेतकरी संघाने पालिका प्रशासनाला आठ दिवसांपूर्वी अडथळा ठरणारी फांदी तोडण्याची परवानगी मागितली होती. मात्र, गुरुवारी सकाळी फांदीऐवजी अध्र्या बुंध्यापासून झाडच कापण्यात आले. याचा फायदा घेत वीज वितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांनी तारांना एक फांदी अडथळा ठरते म्हणून तीदेखील कापावयास लावली. तार ऑफीस रोडवरील नागरिकांनी या प्रकाराला विरोध केला. मात्र, त्यांचे प्रामाणिक प्रयत्न 15 वर्षांपूर्वीचे हे डेरेदार झाड वाचवू शकले नाही. काही मिनिटातच ते बोडके झाले.

झाडावर कुर्‍हाडींचे घाव बसत असल्याने व्यथित झालेल्या काही नागरिकांनी तहसीलदार पी.एस.राजपूत यांची भेट घेतली. साहेब, झाड तोडण्यापासून वाचवा, अशी विनंती केली. मात्र, तहसीलदारांनी संवेदनशीलता दाखवली नाही. हा विषय नगरपालिकेचा असल्याचे सांगून त्यांनी वृक्षप्रेमींना पिटाळून लावले. यानंतर काहींनी प्रांताधिकारी राहुल मुंडके यांना भ्रमणध्वनीवरून माहिती देत झाड वाचवण्याची विनंती केली. मात्र, आज रक्षाबंधनाची शासकीय सुटी आहे. तुम्ही शुक्रवारी कार्यालयात येऊन अर्ज करा. त्यानंतर पंचनाम्याचे पाहू, असे उत्तर मिळाल्याचे नागरिकांनी सांगितले.

एकूणच तहसीलदार पी. एस. राजपूत, मुख्याधिकारी अनिल जगताप यांचे शहर आणि तालुक्यातील वृक्षसंवर्धनाचे प्रेम बेगडी आहे की काय? अशी शंका अनेकांनी व्यक्त केली. हे सर्वच अधिकारी जाहीर कार्यक्रमांमधून वृक्षलागवड, पर्यावरण संवर्धनाबाबत आपण किती गंभीर आहोत, हे दाखविण्याची एकही संधी सोडत नाहीत. मात्र, यांच्या करणी आणि कथनीमध्ये फरक असल्याचे वृक्षतोडीच्या वारंवार होणार्‍या घटनांवरून पुढे येत आहे. यामुळेच लाकूडतोडे सर्रासपणे वृक्षतोड करीत आहेत. कोणतेही सबळ कारण नसताना केवळ मालवाहतुकीच्या वाहनांना फांदी अडथळा ठरते, असे भासवून संपूर्ण झाडच बोडके करण्याचे कारण काय? असा प्रo्न निर्माण होऊन झाड तोडणार्‍यांवर कारवाईची मागणी पुढे आली आहे. यापूर्वी शहरात परवानगी न घेता वृक्षतोडीच्या घटना समोर आलेल्या आहेत.
पालिकेकडून परवानगी नाहीच - शहरात कोठेही वृक्षतोड होत असेल तर ती बेकायदेशीर आहे. कारण पालिका प्रशासन झाडेच काय फांदी तोडण्यासाठीही परवानगी देत नाही. यामुळे कोणीही वृक्षतोड करीत असेल तर कारवाई होईल. तार ऑफीस रोडवर करण्यात आलेल्या वृक्षतोडीची माहिती घेऊन जाब विचारू. प्रसंगी कारवाई सुद्धा होईलच. उमेश नेमाडे, नगराध्यक्ष
फक्त फांदीच तोडायची होती - तालुका शेतकरी संघाच्या गोडाऊनमध्ये मोठी अवजड वाहने जाताना फांदीचा अडथळा येत होता. त्यामुळे फांदी तोडायची होती. मात्र, वीज वितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांनी झाड तारांनाही अडथळा ठरते, असे सांगून अध्र्यातून कापण्यास सांगितले. आम्हाला केवळ फांदी तोडायची होती. वीज कंपनीने ते बुंध्यापासून कापले. गजानन सरोदे, चेअरमन, तालुका शेतकरी संघ
वनविभागाकडे तक्रार दाखल - तार ऑफीस रोडवरील वृक्षतोडप्रकरणी शहर पोलिस आणि वनविभागाकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई होणे अपेक्षित आहे. महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी झाड तोडण्याची माहिती मिळताच तो प्रकार थांबवावा. नंतर पंचनामा करून उपयोग नाही. नितीन नंदवणे, वृक्षप्रेमी, भुसावळ
अत्यंत निंदनीय प्रकार - पालिकेकडे फक्त फांद्या तोडण्याची परवानगी मागणारा अर्ज देऊन 90 टक्के झाड तोडणे अत्यंत निंदनीय प्रकार आहे. पूर्वनियोजित पद्धतीने ही वृक्षतोड झाल्याचा अंदाज आहे. दोषींवर कारवाई होणे गरजेचे आहे. सचिन झोपे, अध्यक्ष, ग्रीन ओझोन फाउंडेशन, भुसावळ
परवानगीतून केली दिशाभूल - तालुका शेतकरी सहकारी संघाने आठ दिवसांपूर्वी पालिका प्रशासनाकडे वाहनांना अडथळा ठरणारी फांदी तोडण्यासाठी अर्ज दिला होता. नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी यावर कोणताही निर्णय दिलेला नाही. गुरुवारी मात्र शेतकरी संघाने अचानकपणे हे झाड अध्र्यातून तोडले. वीज वितरण कंपनीचे कर्मचारी तर हे झाड मुळासकट तोडण्यासाठी भलतेच उताविळ होते. शहरात अनेक इमारतींवरून वीज तारा गेल्या आहेत. अशा ठिकाणी कर्मचारी एवढी तत्परता कधीही दाखवत नाहीत, असा सूर उमटताना दिसतो.
आता पालिकेच्या भूमिकेकडे लक्ष - तार ऑफीस रोडवर सार्वजनिक जागेवरील पालिकेच्या मालकीचे झाड गुरुवारी तोडण्यात आले. तालुका शेतकरी सहकारी संघ आणि वीज वितरण कंपनीने या झाडाची कत्तल केली. पालिकेच्या मालकीच्या झाडांची कोणीही तोड करत असेल तर कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र, पालिकेप्रमाणेच तालुका शेतकरी संघावर राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याने पदाधिकारी भूमिका बदलतात की काय ? की प्रामाणिकपणे कारवाई, याकडे वृक्षप्रेमींचे लक्ष आहे.
झाड नडले, अतिक्रमणाला अभय - झाडाची फांदी अडथळा ठरत असल्याचे कारण पुढे करून झाड तोडण्यात आले. मात्र, तार ऑफिस परिसरात हा प्रकार झाला, तेथे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी काही दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. अनेकांचे साहित्य दुकानाच्या हद्दीबाहेर बाराही महिने पडलेले असते. वाढत्या अतिक्रमणामुळे रस्ता दिवसेंदिवस अरूंद होत आहे. यामुळे संघात जाणार्‍या वाहनांना अडथळा येतो. मात्र, याबाबतही कारवाई करावी, यासाठी शेतकी संघाचे प्रशासन आणि पदाधिकार्‍यांनी कधी प्रयत्न केल्याचे ऐकिवात नाही.