आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव शहरात ‘कु-हाड’राज; पालिकेचे डोळे अद्यापही मिटलेलेच

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - शहरात झाडांवर कु-हाडीचे घाव सुरू असताना पालिकेने मात्र डोळे मिटले आहेत. प्रशासनाने ‘काय करायचे ते करा,’ अशी भूमिका घेतल्याने शहरात धारदार कु-हाडी झाडांचे जीव घेत आहेत. पालिकेने डोळे झाक केली असतानाच पुतना मावशीसारखे वृक्षप्रेम असणारे चमको वृक्षप्रेमीदेखील शहरातून अचानक गायब झाल्याने कु-हाड राज सुरू झाले आहे. या मालिकेचा कळस जिल्हा मध्यवर्ती बॅँकेने गाठला आहे. बॅँकेच्या आवारातील मोठे अशोक वृक्षाचे झाड तोडले आहे. ते झाड कुणी तोडले? याबाबत मात्र माहिती नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या मुख्य इमारतीच्या उजव्या बाजूला असलेल्या पार्किंगशेजारी 10 वर्षांपेक्षा मोठे अशोक वृक्षाचे झाड तोडण्यात आले आहे. कोप-यात असलेले हे झाड कोणतेही कारण नसताना तोडण्यात आले आहे. वृक्षतोडीसाठी महापालिकेची परवानगी घेण्यात आलेली नाही. याबाबत बॅँक प्रशासनाकडे विचारणा केली असता, बँकेच्या आवारात अशोक वृक्षच नाही, झाड तोडले नसल्याचा दावा करत, असे झाड तोडले गेले असेल तर त्याबाबत काहीही माहीत नसल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
महापालिका डोळ्यावर हात ठेवूनच - कामात वारंवार सांगून सुद्धा महापालिका डोळ्यावर हात ठेवून झापडे लावून चालत असल्याचा प्रत्यय येत आहे. त्यामुळे प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील वृक्षतोडीबाबत कुणी काहीही म्हणा आम्ही काहीच करणार नसल्याचा पवित्रा महानगरपालिकेने घेतला आहे. चार दिवसांपूर्वी श्रीकृष्ण लॉनवर झालेल्या वृक्षतोडीबाबत तेथे जाऊन पाहणी करणार असल्याचे पालिकेतर्फे सांगण्यात आले होते.
वरिष्ठांकडून अद्यापही आर टोचली गेली नसल्यानेपर्यावरण विभागाचे कर्मचारी तिकडे फिरकलेच नसल्याची स्थिती आहे. तर महानगरपालिकेतील पदाधिकारी मात्र, लाकूडतोड्यांच्या गोष्टीपासून लांबच आहेत.
मेहरूणमध्ये निंबाचे झाड तोडले - मेहरूणमधील संतोषीमाता मंदिराजवळ असलेले कडूनिंबाचे झाड मंगळवारी तोडण्याचा प्रयत्न झाला. झाडाची छाटणी करण्यात आली. कुणीच हरकत घेत नसल्याचे लक्षात आल्यानंतर झाडाचा शेंडादेखील तोडण्यात आला. झाड तोडण्याची परवानगी घेतली का?अशी विचारणा केली असता, कसली परवानगी, नगरपालिकेचे साहेब काहीच करत नसल्याचे उत्तर देण्यात आले. याबाबत पालिकेच्या पर्यावरण विभागाकडे विचारणा केली असता, मेहरूण आणि जिल्हा बॅँकेतील झाडे तोडण्याची परवानगी घेतली नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या दोघांवर काय कारवाई होते, याची आता प्रतीक्षा आहे.