आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाकूडतोड्यांविरुद्ध गुन्हा दाखल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - वृक्षतोड थांबविण्यात महापालिकेच्या यंत्रणेला अपयश येत आहे. त्यामुळे वृक्षतोडीबाबत कठोर भूमिका घेत गुरुवारी महापालिका आयुक्त पर्यावरण विभागावर संतापले. आजच्या आज गुन्हे दाखल करा; अन्यथा कारवाईला सामोरे जाण्याचा इशारा देत त्यांनी गुन्हे दाखल करण्याबाबत पोलिस अधीक्षकांचे मार्गदर्शन घेतले. आयुक्तांचा रुद्रावतार पाहताच पर्यावरण विभागाने पोलिस ठाणे गाठले. त्यानुसार पर्यावरण विभागाच्या कर्मचा-याने दिलेल्या फिर्यादीवरून रात्री तालुका पोलिस ठाण्यात कृषी विद्यालयाच्या प्राचार्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
शहरातील वृक्षतोडीबाबत गेल्या काही दिवसापासून ‘दिव्य मराठी’ने सातत्याने वृत्त प्रसिध्द केले होते. त्यानतरही कुंभकर्णी झोपेत असलेल्या महापालिका प्रशासनाकडून गुन्हे दाखल होत नसल्याने जीवंत वृक्षावर कुºहाडीचे घाव सुरु होते. त्यामुळे पालिकेच्या कामगिरीवर प्रचंड नाराजी व्यक्त करत बुधवारी संतप्त झालेल्या जिल्हाधिका-यांनी आयुक्तांकडे वृक्षतोडीबाबतचा खुलासा मागविला होता. त्यानतंर शहरातील वृक्षतोडीमुळे त्रस्त झालेल्या आयुक्तांनी गुरुवारी सकाळपासून यंत्रणेला धारेवर धरले. गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांचे सहकार्य मिळत नसल्याचे कारण पुढे येताच, आयुक्त प्रकाश बोखड यांनी उपायुक्त भालचंद्र बेहेरे यांना सूचना करून वृक्षसंवर्धन कायद्याच्या नोट्स मागविल्या.
कृषी विद्यालयाला दणका - निमखेडी रस्त्यावरील कृषीतंत्रविद्यालयाच्या प्राचार्यांना महापालिका वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी न घेता गट क्र. 37 मधील चार व 51 मधील 1 असे पाच कडूनिंबाची झाडे तोडून पर्यावरणाचा -हास केल्याबरोबरच नुकसानही केले. म्हणून महापालिकेचे पर्यावरण अधिकार दिलीप सखाराम सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादंवि कलम 427 व महाअर्बन नागरी क्षेत्र झाडांचे जतन कायदा 1975/8/21 प्रमाणे प्राचार्य एस. जे. पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार रमेश पवार करीत आहेत.
कायदा काय सांगतो? - मनपा क्षेत्रात स्थानिक प्रशासनाची परवानगी न घेता एखादा वृक्ष तोडल्यास संबंधितांवर ट्री अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात येतो. महाराष्ट्र वृक्षसंवर्धन व संरक्षण कायदा 1975च्या कलम 21 नुसार वृक्षतोड करणा-यांना 1 हजार ते 5 हजार रुपये दंड व गुन्हा सिद्ध झाल्यास एक आठवडा ते एक वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते. तसेच वृक्षतोडीनंतर तरतुदीप्रमाणे नवीन वृक्षाची लागवड करणेही आवश्यक आहे.
आयुक्तांनी थोपडले दंड - वृक्षतोडीप्रकरणात गुन्हा दाखल करून घेण्यास नकार देणा-या पोलिसांच्या हातावरही कायद्याच्या प्रती ठेवून आजच गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले. त्याचप्रमाणे गुन्हे दाखल न झाल्यास जबाबदार अधिकारी व कर्मचा-यांवर गुन्हे दाखल करू, असा दम भरला.
बँकेचे वरातीमागून घोडे - वृक्षतोडीबाबत काहीच माहित नाही म्हणणारे जिल्हा बॅँकेचे एम.डी. जितेंद्र देशमुख यांनी बॅँकेच्या आवारात वृक्षतोड झाल्याचे मान्य केले. वृक्षतोडीचे वृत्त प्रसिद्ध होताच सदर खोड गायब करण्यात आले. महापालिकेच्या पर्यावरण विभागातर्फे बॅँकेला खुलासा विचारण्यात आला तेव्हा ‘आमचे चुकलेच’ म्हणत एम.डीं.नी वृक्षतोडीनंतर महापालिकेकडे परवानगीसाठी पत्र लिहिण्याची तयारी दर्शविली.
लक्ष ठेवण्याचे पथकाला आदेश - वृक्षतोडीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी झोनल ऑफिसरवर टाकण्यात आली आहे. प्रत्येक झोनमध्ये अनधिकृत बांधकाम पथकाने अतिक्रमणांची पाहणी करताना वृक्षतोडीबाबतही पाहणी करून माहिती द्यावी, असे आदेश आयुक्तांनी गुरुवारी काढले.
पोलिस अधीक्षकांचे मार्गदर्शन - वृक्षतोडीबाबत गुन्हे दाखल करण्यासाठी तक्रार अर्ज दिल्याने पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. फिर्याद दिली तरच गुन्हा दाखल करू, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले होते. याबाबत आयुक्तांनी पोलिस अधीक्षकांचे मार्गदर्शन घेतले. गुन्हे दाखल करण्यासाठी अर्ज द्यावा की फिर्याद हे ं समजून घेतले. तसेच जिल्हापेठ, शहर आणि एमआयडीसी ठाण्यांना गुन्हा दाखल करून घेण्याबाबत सूचना देण्याचे सांगितले.