आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरण : शहरातील वृक्षारोपण ठरावाला लागला ब्रेक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - पालिकेच्या बैठकीत ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ या योजनेतून करण्यात येणारे वृक्षारोपण, संवर्धन आणि संरक्षणाच्या महत्त्वकांक्षी कामाला ब्रेक लागला आहे. विधान परिषद निवडणुकीनिमित्त लागलेली आचारसंहिता शिथिल न झाल्याने निविदा प्रसिद्धी रखडली आहे. यामुळे गतवर्षाप्रमाणेच यंदाही शहरात वृक्ष लागवड होणार नसल्याचे चित्र आहे.

पालिकेने गेल्या वर्षी शहरात व्यापक प्रमाणात वृक्ष लागवडीचे नियोजन केले होते. नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी याबाबतचा कृती आराखडादेखील तयार केला होता. पालिकेच्या बैठकीत या विषयाला मंजुरीदेखील मिळाली होती. मात्र, प्रशासकीय ढिसाळ यंत्रणेकडून सामाजिक वनीकरण विभागाकडे पाठपुरावा झाला नाही. परिणामी शहरातील वृक्षारोपणाला ब्रेक लागला. यंदा मात्र गतवर्षासारखी स्थिती होऊ नये, म्हणून 31 मे रोजी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक 16नुसार वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाच्या विषयाला सर्वानुमते मंजुरी मिळाली. मात्र, प्रशासनाकडून होणारी दिरंगाई कायम आहे. विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे गेल्या महिनाभरापासून निविदा प्रसिद्ध झालेली नाही. आचारसंहिता शिथिल झालेली नसल्याने प्रशासनाला निविदा प्रसिद्धीवर बंधने आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर अजून वृक्षांचा पुरवठादार मिळाला नसल्याने यंदा सुद्धा केवळ कागदावरच वृक्षारोपण पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. पालिका प्रशासन आणि नगराध्यक्षांनी सकारात्मक भूमिका घेतली, तरच हा तिढा सुटणे शक्य आहे.

वृक्ष संवर्धनाचे असे नियोजन
पालिकेचे पावसाळ्यात शहरामध्ये सर्वसमावेशक वृक्षारोपणाचे नियोजन होते. शाळा, महाविद्यालय, विविध धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक आणि पर्यावरण क्षेत्रात काम करणा-या संस्थांचे पदाधिकारी श्रमदानातून वृक्ष लागवड आणि संवर्धन करणार होते. नगराध्यक्ष उमेश नेमाडेंनी यासाठी माऊथ पब्लिसिटी सुरू केली होती. मात्र, प्रशासकीय प्रक्रियाच पूर्ण होत नसल्याने आगामी काळात वृक्षारोपण होईल का? याबाबत मात्र प्रश्नचिन्ह कायम आहे.

यंदा पावसाची दडी बाधक
गतवर्षी शहरात सरासरीपेक्षा दीडपट पाऊस झाला. यामुळे वृक्षारोपण केले असते तर 100 टक्के झाडे जगली असती. यंदा पालिकेने वृक्ष लागवडीची तयारी केली असली तरी पावसाने मात्र दडी मारली आहे. पालिकेचे नियोजन पूर्ण झाले तरी पाऊस झाल्याशिवाय वृक्षारोपण करता येणार नाही. सामाजिक वनीकरण विभाग किंवा पुरवठादाराकडून वृक्षांची खरेदी करून सुरक्षित ठिकाणी त्यांचा साठा करणे आवश्यक आहे. पाऊस झाल्यानंतर तत्काळ अधिक उंचीची झाडे लावल्यास 90 टक्क््यांपर्यंत वृक्ष जगतील.

लागवड दूरच, तोड थांबेना
पालिका हद्द आणि हद्दीबाहेरील भागात सध्या बेसुमार वृक्षतोड सुरू आहे. पालिका आणि महसूल विभागाचे वृक्षतोडीवर नियंत्रण नाही. पालिका प्रशासन लागवड तर दूरच मात्र आहे त्या झाडांची तोडही थांबवत नसल्याची स्थिती आहे. अत्यंत किरकोळ कारणांमुळे वृक्षतोड करणा-यांची संख्या वाढली आहे. गेल्या पाच वर्षांत विनापरवानगीने वृक्षतोड करणारे वाढले असले तरी कारवाईचा मात्र पत्ता नाही.

वृक्ष लागवड होणारच
- प्रशासकीय दिरंगाईमुळे गेल्या वर्षी वृक्ष लागवड झाली नाही, ही बाब खरी आहे. यंदाच्या पावसाळ्यात मात्र व्यापक प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येईल. सर्व संस्था, संघटनांचा समावेश करून हा उपक्रम यशस्वी करणार आहोत. अधिक उंचीची रोपे लावून त्यांचे संवर्धन होईल. यासाठी आवश्यक निविदादेखील लवकरच निघेल. उमेश नेमाडे, नगराध्यक्ष, भुसावळ
फोटो - डमी पिक