आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Trees Cutting Issue At Bhusawal, Palika No Action

भुसावळ शहरात वृक्षतोडीचे सत्र सुरूच; पालिकेच्या वार्‍यावर लाथा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रामुळे शहराचे तापमान सातत्याने वाढते आहे. यावर उपाय म्हणून व्यापक प्रमाणात वृक्षलागवड गरजेची आहे. मात्र, सद्य:स्थितीत वृक्षलागवड तर दूरच पण आहे त्या वृक्षांच्या संरक्षणाकडे पालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. शनिवार आणि रविवारचा मुहूर्त साधून होणारी वृक्षतोड अजूनही थांबलेली नाही. नगराध्यक्षांचा वृक्षसंवर्धन समिती स्थापन्याचा मनोदय केवळ हवेतच विरू पाहत आहे.

उन्हाळ्यात शहराचे कमाल तापमान 48.5 अंशापर्यंत पोहोचते. यामुळे पालिकेने गेल्या वर्षी एक लाख वृक्षलागवडीचा संकल्प सोडला होता. यापैकी किती रोपे जगली हा संशोधनाचा विषय असला तरी, शनिवार आणि रविवारच्या सुटीचा मुहूर्त साधून सर्रास वृक्षतोड होते. गेल्या दोन दिवसात हॉटेल प्रीमिअरसमोरील सप्तपर्णीच्या वृक्षांवर या पद्धतीनेच कुर्‍हाडींचे घाव बसले. रस्त्यावर असलेले आणि कोणताही अडथळा न ठरणारे हे वृक्ष का तोडण्यात येत आहेत,याचे उत्तर संबंधितांकडे नव्हते.

कायद्याचा बडगा उगारू
पालिका शहरात लवकरच वृक्ष संवर्धन समितीची स्थापना करणार आहे. यामुळे वृक्षतोडीवर निर्बंध येतील. सध्या मनुष्यबळाचा अभाव असल्याने वृक्षतोडीवर नियंत्रण मिळवताना अडचणी येतात. मात्र आता कायद्याचा बडगा उगारण्याची वेळ आली आहे, असे वाटते.
-उमेश नेमाडे, नगराध्यक्ष, भुसावळ पालिका

परवानगी देत नाही
वृक्षतोड थांबवण्यासाठी पालिका आता कठोर कारवाई करेल. नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी ऑगस्ट महिन्यात वृक्षलागवड जाहीर केली आहे. विनापरवानगीने वृक्षतोड होत असल्यास नागरिकांनी थेट संपर्क साधावा.
-अनिल जगताप, मुख्याधिकारी, भुसावळ

‘हम करे सो कायदा’
पालिका वृक्षलागवडीचा दावा करीत असली तरी, प्रत्यक्षात किती झाडे जगली? त्यांचे संवर्धन झाले का? ही माहिती प्रशासनाकडे नाही. ‘हम करे सो कायदा,’ ही प्रवृत्ती वृक्षतोडीला पोषक ठरत आहे.
-शिशिर जावळे, सामाजिक कार्यकर्ता, भुसावळ