आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांवर आता महापालिकेची नजर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- काव्यरत्नावली चौकात पोलीस अधीक्षकांच्या बंगल्याच्या भिंतीला लागून असलेल्या भागामध्ये महापालिकेने आयलॅण्डची तयारी करण्याचा निर्णय घेतला आहे. भिंतीपासून 9 मीटरच्या अंतरावरील 145 झाडे यापूर्वी तोडली गेली असताना आता रस्त्याकडील बाजूने असलेल्या झाडांवर पालिकेची नजर गेली आहे. दरम्यान, अधूनमधून जेसीबीने धक्के देऊन एकएक झाडे पाडण्याचे प्रकार या भागात सुरू आहेत. एकीकडे तेथे काय करायचे हा निर्णयच अंतिम नसताना वृक्षतोड मात्र सुरूच आहे.

आरटीओ कार्यालयासमोरी रस्त्याचे रुंदीकरण आणि महापालिकेने पोलिस अधीक्षकांच्या बंगल्याची भिंत मागे घेतली आहे. नव्या भिंतीचे बांधकाम पूर्ण झाले असल्याने दोन्ही भिंतीदरम्यान असलेल्या शंभर झाडांचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेने या जागेवर आयलॅण्ड तयार करण्याचे नियोजन केले असले तरी त्या झाडांचे काय होणार याबाबत अद्याप निर्णय घेतला नाही. भिंतीपासून 9 मीटरची जागा ही आयलॅण्डसाठी ठेवण्यात येणार आहे. त्यापुढे असलेली जागा ही रस्ता रुंदीकरणात जाणार असल्याने झाडे तोडली जाण्याची शक्यता आहे. महापालिकेकडून वृक्षतोडीबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. आयलॅण्डचा प्रस्तावदेखील रखडल्याने वृक्षांचा निर्णय लांबणीवर पडला आहे. दरम्यान, निर्णयापूर्वी काही वृक्षांची कत्तल सुरू झाली असल्याचे चित्र आहे. नवीन आणि जुनी भिंत या दरम्यान असलेल्या जागेत सध्या शंभर झाडे आहेत. त्यात 80 झाडे मोठी असून 20 मध्यम आहेत तर लहान झाडेही अनेक आहेत. पिंपळ, काशिद, गुलमोहर, खैर, निलगिरी, कडूनिंब, सुबाभूळ, अशोक, अंजन या प्रजातीची मोठी झाडे या जागेवर आहेत.

पुनरेपण शक्य नाही
चौकात असलेली झाडे ही ठिसूळ प्रवर्गातील आहेत. त्या झाडांचे पुनरेपण करणे शक्य नाही. ती झाडे इजा पोहोचल्यामुळे पुन्हा जगत नाहीत, झाडे कायम ठेवणे हाच त्यावर उपाय असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

वृक्षतोडीबाबत निर्णय नाही
9 मीटर क्षेत्रात येणारी झाडे वाचतील, असा अंदाज आहे, वृक्षतोडीबाबत निर्णय घेतलेला नाही. आवश्यक जागा सोडून उर्वरित जागेत किती वृक्ष जाणार हे प्रत्यक्ष प्लॅनिंग झाल्यानंतरच लक्षात येईल. तथापि अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याने तो विषय पेंडिंग आहे.
-डी.एस.खडके. शहर अभियंता, महापालिका.

..तर ग्रीन बेल्ट तयार होऊ शकतो
भिंतीला लागून असलेली झाडे ही रस्त्याला समांतर सरळ रांगेत आहेत. मोठय़ा झाडांच्या दोन्ही रांगा रस्ता दुभाजकात घेतल्या तर ती वृक्षांची तोड टळू शकते. इतर झाडेदेखील वाचविता येऊ शकतात. मुळात झाडे तोडण्याची गरजच नाही, रस्ता आधीच रुंद असल्याने आहे त्या झाडांना वाचवून तेथे ग्रीन बेल्ट तयार करता येऊ शकतो. झाडे तोडू नये याबाबत आम्ही स्वत: लक्ष ठेवून आहोत.
-दीपक तांबोळी, आर्किड नेचर क्लब.

झाडे वाचवण्याबाबत दक्षता घेऊ
हा विषय शहर अभियंत्याकडे आहे. प्रत्यक्ष आराखडा काय तयार होतो, त्यावर निर्णय होईल.मात्र झाडे तोडली जाऊ नये याबाबची दक्षता घेवू.
-भालचंद्र बेहेरे, उपायुक्त, महापालिका

नऊ मीटर जागा राखीव ठेवणार
पोलीस अधीक्षकांच्या बंगल्याची भिंत मागे घेण्यासाठी बांधकाम करताना यापूर्वीच लहान मोठी 145 झाडे तोडण्यात आलेली आहेत. भिंतीपासून 9 मीटर जागा ही राखीव ठेवण्यात येणार असताना या जागेवर केवळ तीन ते चार झाडे आहेत तर उर्वरीत झाडे या परिघाच्या बाहेर असल्याने त्यांच्यावर कुर्‍हाड चालण्याची शक्यता आहे.