आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Trees Cutting Issue At Jalgaon Meharun Area Collector Warring

वृक्ष कत्तल प्रकरण: जिल्हाधिकार्‍यांकडून चोपडे, खडकेंची खरडपट्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- मेहरूण तलावाजवळ झालेल्या वृक्षतोडप्रकरणी कारवाई न करता दोन दिवस हद्दीच्या वादात अडकलेल्या वनविभाग आणि महापालिकेच्या अधिकार्‍यांवर जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी संताप व्यक्त केला. वृक्षतोड करणार्‍यांवर गुन्हा दाखल न केल्याप्रकरणी महापालिका वृक्ष अधिकारी डी. एस. खडके आणि जळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक सुरेंद्र चोपडे यांना जबाबदार धरले. तसेच गुन्हा दाखल न केल्यास दोन्ही अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

बुधवारी वृक्षतोड करताना पकडलेले ट्रॅक्टर वनविभागाने ताब्यात घेतले; परंतु वृक्षतोड महापालिका हद्दीत झाल्याने त्यांनी गुन्हा दाखल केला नाही. घटना घडून दुसरा दिवस उलटूनही हद्दीचा वाद कायम असल्याने जिल्हाधिकार्‍यांनी दोन्ही विभागांच्या प्रमुख अधिकार्‍यांना धारेवर धरले. महापालिकेच्या अधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना वनविभागाने गुन्हा दाखल केल्याची खोटी माहिती दिली. त्याची पडताळणी केल्यानंतर वस्तुस्थिती समोर आल्याने जिल्हाधिकार्‍यांनी गुरुवारी दोन्ही अधिकार्‍यांना फैलावर घेतले.

अधिकार्‍यांनीच झाडे तोडली!
‘वृक्षतोड करणारे चोर आहेत. तुम्ही शासकीय अधिकारी. मग गुन्हा दाखल करण्यास का घाबरतात? तुम्हीच झाडे तोडली, असा त्याचा अर्थ काढला जाऊ शकतो. शिक्षा तुम्हाला नव्हे, तर वृक्षतोड करणार्‍यांना होणार आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे समन्वय ठेवून दोघांनी संयुक्तपणे गुन्हा दाखल करा. तसेच न्यायालयातदेखील गुन्हा दाखल करा; अन्यथा मला तुमच्यावर कारवाई करावी लागेल, असा इशारा या वेळी जिल्हाधिकार्‍यांनी दिला. त्याचप्रमाणे गुन्हा दाखल करून तत्काळ अहवाल देण्याची सूचना डी.एस. खडके यांना केली. याशिवाय तोडण्यात आलेले वृक्ष वनविभागाकडून ताब्यात घेऊन स्मशानभूमीत वापरण्याच्याही सूचनाही दिल्या.

रात्री गुन्हा दाखल
जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानंतर वन विभागाने रात्री ट्रॅक्टर चालक आणि ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. वन विभागाचे अधिकारी तहसीलदारांसोबत शुक्रवारी जागेचा पंचनामा करून जमीन मालकावरही गुन्हा दाखल करणार आहेत. दरम्यान, महापालिकादेखील वृक्षतोड करणार्‍यांवर न्यायालयात खटला दाखल करणार आहे.