आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tribal Student Hostel Admission Online Registration Rule Cancel

वसतिगृहासाठी ऑनलाइनची सक्ती रद्द

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थांच्या वसतिगृहात प्रवेशासाठी काही जाचक अटी घालण्यात आल्या होत्या. मात्र, आता अशा अटी काढून टाकण्याचा निर्णय आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी घेतला आहे. त्यानुसार आदिवासी विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइनसह नेहमीच्या पद्धतीनेही अर्ज करता येणार आहेत. सोमवारी याबाबतचे पत्र विभागाने काढले असून मंगळवारपासून हा निर्णय लागू केला जाणार आहे.

आदिवासी विकास विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिचड यांनी काही दिवसांपूर्वी आदिवासी विभागातील आमदारांची मंत्रालयात बैठक घेतली होती. या वेळी 25 पैकी 23 आमदार उपस्थित होते. या बैठकीत अनेक आमदारांनी काही नियम हे जाचक असल्याचे पिचड यांच्या लक्षात आणून दिले. त्यामुळे पिचड यांनी अडचणीचे ठरणारे नियम बदलण्यात येतील, असे आश्वासन आमदारांना दिले होते.

राज्यात एकूण 464 आदिवासी वसतिगृहे असून त्यात 28 हजार आदिवासी विद्यार्थी राहतात. या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागत असे. तसेच परीक्षेत पूर्वीपेक्षा पाच टक्के गुण जास्त मिळवणे बंधनकारक करण्यात आले होते. पिचड यांनी दोन्ही निर्णय बदलले आहेत. त्यानुसार आता विद्यार्थ्यांना वसतिगृहासाठी ऑनलाइन अर्ज करण्याबरोबरच नेहमीच्या पद्धतीनेही अर्ज करता येणार आहेत. याबाबतचे पत्र राज्यातील सर्व आदिवासी वसतिगृहांच्या संचालकांना पाठवण्यात आले आहे. तसेच पाच टक्के गुणांची अटही रद्द करण्यात आली आहे.