आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रासंगिक; उतावीळ की निष्काळजी!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या पाच महिन्यांत चाळीसगाव परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात सहा जणांचा बळी गेला आहे. जुुलै, ऑगस्ट २०१७  मध्ये बिबट्याने जिवंत माणसांचा फडशा पाडला. त्यानंतर आॅक्टोबरमध्ये अत्यंत सुदृढ, तंदुरुस्त डरकाळ्या फोडणाऱ्या लांबलचक बिबट्याला वन विभागाने पिंजऱ्यात जेरबंद केले होते. काही दिवस शांतता पसरल्यानंतर पुन्हा बिबट्याने एकाचा बळी घेतला. आता हा दुसरा बिबट्या आहे. एक घटना उलटत नाही तोच दुसरी, तिसरी आणि सोमवारी पिस्तूलधारी मंत्री गिरीश महाजनांसह वन विभागाच्या फौजफाट्याने दिवसभर बिबट्याचा शोध घेतला; तो तर सापडला नाही, पण त्याच दिवशी मध्यरात्रीनंतर पहाटे वरखेडे खुर्द येथून आपल्या परिवारासोबत झोपलेल्या वृद्ध महिलेला घेऊन बिबट्या पसार झाला. दुसऱ्या बिबट्याने घेतलेला हा चौथा बळी आहे. मंगळवारी पहाटे बिबट्याने नेलेल्या महिलेचे धडावेगळे झालेले शरीरच नातेवाइकांच्या हाती आले. वरखेडे शिवारातील काही लोकांनी पहाटे त्याला पाहिल्याचे सांगितले जात आहे. नरभक्षक झालेल्या या बिबट्याला जिवंत  पकडा नाही तर ठार मारण्याचे आदेश वन्यजीव प्रशासनाने दिले आहेत. त्यानंतर राज्यभरातील वन विभागाची यंत्रणा चाळीसगावात दाखल झाली. शार्प शूटरही तैनात करण्यात आले आहेत. वरखेडे परिसरातील जंगलाला आता वन विभागाने घेरले आहे. 


सहा जणांचा बळी गेल्यानंतरही बिबट्याला ठार मारण्याचे आदेश देण्याबाबत वन विभागाने कोणताही उशीर केलेला नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. पहिला बिबट्या पकडला गेल्यानंतर धुमाकूळ घालणारा दुसरा बिबट्या नाशिक विभागातून मेंढीपालन करणाऱ्या कळपाच्या मागावर थेट चाळीसगाव परिसरात येऊन पोहोचल्याचा त्यांचा अंदाज आहे. त्यामुळे योग्य वेळी त्यांनी आदेश मिळवल्याचा दावा एका जबाबदार अधिकाऱ्याने केला आहे. प्रशासनाने पहिला बळी गेल्यानंतर लगेच यंत्रणा कामाला लावायला हवी होती, पण तेवढ्या गांभीर्याने हा विषय त्यांनी घेतला नाही, त्यामुळे ते टीकेचे लक्ष्य झाले आहेत. अधिवेशनात चौकशीच्या रडारवरही  हा विषय येईलच, पण यापेक्षा गंभीर बाब म्हणजे मंत्री गिरीश महाजन हे थेट जंगलात पिस्तूल घेऊन वन विभागाच्या अधिकाऱ्यांपुढे धावतात ही मोठी आश्चर्याची बाब आहे. महाजनांनी मीडियासमोर आपली बाजू मांडली आहे. गावकऱ्यांनी घेराव घातला. बिबट्याची डरकाळी ऐकल्यानंतर वरखेडे गावाचे लोक सैरावैरा पळत होते. गावातील हे वातावरण पाहून मंत्री महाजनदेखील वन विभागाचे अधिकारी आणि जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकरांसह जंगलात धावले. आपल्याकडे परवाना असलेले पिस्तूूल आहे म्हणून त्यांनी ते स्वसंरक्षणार्थ बाहेर काढल्याचे ते सांगतात. महाजनांच्या म्हणण्यात तथ्य आहे असे म्हटले तरी चित्रफीत पाहिल्यावर ते पटत नाही. ज्यांची हयात जंगलात गेली ते सर्व अधिकारी आणि ताफा मागे आणि महाजन मात्र पिस्तूल घेऊन पुढे. मंत्रीच पुढे म्हटल्यावर त्यांच्या मागे ताफा धावत होता. बिबट्या म्हणजे काय मांजर आहे काय ? झुडपाखाली वाकून त्याला पकडता येईल किंवा ठार मारता येईल. भुसावळ परिसरात शिरलेल्या अशाच एका बिबट्याला पकडायला गेलेल्या पथकावर त्याने जोरदार प्रतिहल्ला केला आणि तो केव्हा, कुठून कसा निसटला हे समजलेही नाही. डोळ्याची पापणी हलावी तेवढ्या वेगाने ही घटना घडली होती  आणि त्यात एक फोटोग्राफर जखमीही झाला होता. त्यामुळे महाजनांचा खुलासा पटत असला तरी त्यांच्या कृतीचे समर्थन कोणी करूच शकत नाही. त्यांच्या पिस्तूलमधून गोळी झाडल्यानंतर बिबट्या ठार झाला असता तर ते कदाचित हीरो झालेही असते. पण झाडीमधून त्याने उलट झडप घातली असती तर महाजनांच्या जिवावरही बेतले असते किंवा अन्य कुणीही तावडीत सापडला असता हे वन विभागातील काही लोक खासगीत सांगत आहेत. विशेष म्हणजे मंत्रिमहोदयांसोबत जिल्हाधिकारी स्वत: आणि वनाधिकारी होते, त्यांनी तरी महाजनांच्या उत्साहाला आवर घालायला हवा होता. कोणतीही घटना सांगून येत नाही. बिबट्याला पिस्तूलने ठार मारणे हे ढोल वाजवणे किंवा मोटारसायकल, ट्रक चालवण्याएवढे सोपे नाही, अर्थात हे महाजनांनाही चांगले ठाऊक आहे. पण राज्याचे ते जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री आहेत. जळगावात त्यांनी मेडिकल कॉलेज मंजूर करून आणले आहे. त्यामुळे जळगावकरांची चांगली सोय होणार आहे. राज्यभर ते महाआरोग्य शिबिरे घेत आहेत. जनतेच्या आरोग्याची काळजी घेणारे, चांगले काम करणारे मंत्री स्वत:च्या जिवाबद्दलच एवढे निष्काळजी असतील तर मीडियाला निश्चितच त्यांची काळजी करावीच लागेल. मंत्री महाजनांच्या या कृतीला कुणी उतावीळ तर कुणी निष्काळजीपणा म्हणेल. पण जे घडले त्याचे कुणीच समर्थन करणार नाही, हे मात्र तेवढेच खरे आहे.   


-त्र्यंबक कापडे,  निवासी संपादक, जळगाव

बातम्या आणखी आहेत...