आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक; शरद पवारांच्या वाटेवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे, या मागणीसाठी गत अधिवेशनात काँग्रेस-राष्ट्रवादी या विरोधी पक्षांसह सत्तेतील भागीदार असलेल्या शिवसेनेनेही फडणवीस सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. केवळ कर्जमाफीच्या मुद्यावरच अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजले, अनेकदा कामकाजही बंद पाडले गेले. अखेर फडणवीसांना झुकावे लागले. अधिवेशनाचे सुप वाजण्याआधी त्यांनी कर्जमाफीला तत्त्वत: मंजुरी देत असल्याची घोषणा केली. कर्जमाफीचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, यावरही बरेच दिवस खल चालला. अखेर पात्र शेतकऱ्यांचे निकष तयार करण्यात आले आणि या निकषात बसणाऱ्यांच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल, असे सांगण्यात आले. फडणवीस सरकारने कर्जमाफी मिळालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना कोरा उतारा देण्याचा सोहळाही साजरा केला; पण प्रत्यक्षात अनेकांना लाभच मिळाला नसल्याच्या तक्रारी समोर आल्या. कर्जमाफीचा घोळ अजूनही सुरूच आहे. कर्जमाफीचा लाभ होत नाही, तोच शेतकरी कापसावरील बोंडअळीच्या संंकटाने बेजार झाला आहे. कापसावरील बोंडावर अळी पडल्यामुळे कापूस फुटतच नाही. त्यामुळे कापसाचे उत्पन्नही यंदा घटणार आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. कापूस पिकावर संकट आले असताना शासनातर्फे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. सोयाबीन पिकांचेही तेच झाले आहे. आता समुद्रातील ‘ओखी’ या चक्रीवादळामुळे वातावरणात कमालीचा बदल होऊन उत्तर महाराष्ट्रातील द्राक्ष, डाळिंब, कांदा पिकाचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एकंदरीत सर्वच पातळ्यांवर तयार झालेल्या सरकारविरोधी वातावरणाची हवा राष्ट्रवादीला कळली आणि त्यांनीही आपल्या राजकारणाची दिशा बदलली. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे विदर्भाच्या दौऱ्यावर होते. विदर्भ तसा राष्ट्रवादीसाठी फारसा जवळचा नाही, कारण येथे राष्ट्रवादीची पाटी कोरीच आहे. त्यामुळे ताकद वाढवण्याच्या दृष्टीने पवारांनी तेथे चार दिवस मुक्काम ठोकला होता. विदर्भातील हवेचा रोख त्यांनी जाणून घेतला. त्यानंतर चार दिवसांपूर्वी पवार कन्या खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी नेते अजित पवार, जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी रस्त्यावर उतरून सरकारवर हल्लाबोल करण्याचा निर्धार केला आहे. हे नेते यवतमाळ ते नागपूर ११ दिवस पदयात्रेने जाऊन थेट शेतात शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. दररोज १० ते १५ किलोमीटर हे नेते पायपीट करणार आहेत. फडणवीस सरकारवर शेतकऱ्यांची प्रचंड नाराजी असल्याच्या प्रतिक्रिया उमटत असल्याचा दावा सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी नेते करीत आहेत. ११ डिसेंबरपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ होत आहे. या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यासह अन्य प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस हल्लाबोल करणार आहे. किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला? याची शेतकऱ्यांच्या नावासह सरकार यादी जाहीर करत नाही तोपर्यत अधिवेशनाचे कामकाज चालू देणार नाही, असा निर्धार राष्ट्रवादीने केला आहे. त्यामुळे फडणवीस सरकारची पुन्हा गत अधिवेशनासारखी या वेळेसही कसोटी लागणार आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यांसह राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा, कापूस पिकाच्या नुकसानीचे पंचनामे होऊन नुकसान भरपाई द्यावी, या विषयांबाबत सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करतील. समाधान न झाल्यास राष्ट्रवादी पक्षाचे नेते दोन्ही सभागृहात सरकारवर हल्लाबोल करतील. मुख्यमंत्रीही तेवढ्याचे त्वेषाने विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देतील किंवा गोंधळ नको म्हणून सभापती काहीवेळ सभागृहाचे कामकाज स्थगित करतील. सरकार कोणाचेही असो आणि विरोधी पक्ष कोणीही असो, ही परंपरा कायम सुरू आहे. अधिवेशन काळात यात्रा काढून जनतेचे लक्ष वेधायचे आणि सरकारला धारेवर धरण्याचे काम सर्वच पक्षाचे नेते सत्तेबाहेर असले की करतात, १९८० मध्ये शरद पवारांनी देखील अशीच यात्रा काढली होती. त्या वेळेसही पवारांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा लावून धरला होता. त्यांनी जळगाव ते नागपूर अशी दांडीयात्रा काढली होती. त्यांची ही यात्रा चांगलीच गाजली होती. पवारांच्या पावलावर पाऊल ठेवत सर्वच पक्षाच्या नेत्यांनी यात्रा काढल्या आहेत. या वेळेस त्यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही पदयात्रा काढून सरकारवर हल्लाबोल करण्याचा निर्धार केला आहे. सरकार कोणतेही असो शेतकऱ्यांचे प्रश्न मात्र सुटता सुटत नाही. शरद पवारांनी ज्या प्रश्नांसाठी आंदोलन केले, यात्रा काढली, तेच काम त्यांच्या दुसऱ्या पिढीला करावे लागत आहे. यापेक्षा दुसरे दुर्दैव ते काय?  


- त्र्यंबक कापडे, निवासी संपादक, जळगाव 

बातम्या आणखी आहेत...