आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जटिल प्रश्न: शिवाजीनगर उड्डाणपुलावर मनपाला अपघाताची प्रतीक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहरातील शिवाजीनगर येथील रेल्वेचा उड्डाणपुलाचा प्रश्न हा अवघड जागेचे दुखणे होऊन बसला आहे. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी स्थिती महापालिकेची आणि शहर वाहतूक विभागाची झाली आहे. ब्रिटिशकालीन असलेल्या या पुलाची कालमर्यादा संपली आहे. मात्र, महापालिकेकडे पूल बांधण्यासाठी निधी नाही आणि अवजड वाहतूक बंद करणे अडचणीचे होत आहे. त्यामुळे प्रशासन आता अपघात होण्याची वाट बघतेय का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
शिवाजीनगरच्या पुलाची कालमर्यादा संपल्याने अवजड वाहतुकीला बंदी असल्याचे फलक या पुलाजवळ केवळ लावण्यात आलेले आहेत. मात्र, दुसरा जवळचा मार्ग नसल्याने सर्व अवजड वाहने याच रस्त्याने वाहतूक करतात. शिवाय यावल, चोपडा, रावेर, फैजपूर तसेच मध्य प्रदेशात जाण्यासाठी याच पुलावरून बसही वाहतूक करतात. त्यांना पर्यायी मार्ग नसल्याने लांबून फिरून जावे लागणार आहे.
त्यामुळे १३ रुपये भाडे होणार आहे. शिवाय दाळफड भागात असलेल्या फायर स्टेशनमुळे अग्निशमन बंबही याच मार्गाने शहरात येतात, शहरात येण्यासाठी तोच जवळचा मार्ग आहे.
२० कोटींच्या निधीची आवश्यकता
शहरातील शिवाजीनगर आणि पिंप्राळा गेटजवळील रेल्वे उड्डाणपुलाला अनेक दिवसांपासून मान्यता मिळाली आहे. मात्र, महापालिकेकडे निधी उपलब्ध नसल्याने उड्डाणपुलांचे काम अजूनही अपूर्णच आहे. त्यात दुष्काळात तेरावा महिना म्हणजे रेल्वेरुळावरील पुलाचे बांधकाम रेल्वेच करणार असल्याचे त्यांचा हट्ट आहे. शिवाजीनगरच्या उड्डाणपुलासाठी २० कोटींच्या निधीची आवश्यकता आहे.
बैठकांना अधिकाऱ्यांची पाठ
शिवाजीनगर पुलावरील अवजड वाहतुकीवर तोडगा काढण्यासाठी शहर वाहतूक विभागाने पुढाकार घेऊन मनपा, राज्य परिवहन विभाग, रेल्वे अधिकाऱ्यांची मंगळवारी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात बैठक घेतली. पोलिस अधिकाऱ्यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे ठोस तोडगा काढण्याच्या वाहतूक विभागाच्या प्रयत्नाला हरताळ फासण्यात आला.

पालकमंत्र्यांना बोलावण्याचे प्रयत्न
-शिवाजीनगर रेल्वेपुलाच्या अवजड वाहतुकीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री, आमदार आणि सर्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून एकत्रित बैठक घेण्याचा प्रयत्न आहे.
चंद्रकांत सरोदे, पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक विभाग