आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाघूर नदीपात्रात ट्रेलर कोसळला; संरक्षक कठडा तुटल्याने धोका वाढला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- चालकाला डुलकी लागल्याने लोखंडी सळईने भरलेला ट्रेलर साकेगावनजीकच्या वाघूर नदीवरील पुलाचा संरक्षक कठडा तोडून पाण्यात कोसळला. त्यात चालक जागीच ठार झाला. ही दुर्घटना गुरुवारी सकाळी 5.15 वाजता घडली.

नागपूर येथून लोखंडी सळईने भरलेला ट्रेलर (क्रमांक एम. एच.04 इ. बी. 8314) मुंबईकडे गुरुवारी जात होता. भुसावळ तालुक्यातील साकेगावनजीक वाघूर नदीवरील पुलाचा कठडा तोडून हा ट्रेलर पाण्यात कोसळला. त्यात चालक मालकितसिंग सिंदरसिंग (वय 22, रा. अमृतसर, पंजाब) यांचा जागीच मृत्यू झाला. क्लिनर रासपालसिंग राजवीरसिंग हा जखमी झाला आहे. गोदावरी हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विश्वजित खुळे, भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे डी. के. शिरसाठ, हवालदार सोमनाथ मोरे, भगवान पाटील, हर्षवर्धन सपकाळे, राजू गजरे, भावराव इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. नदीपात्रातील ट्रेलर बाहेर काढण्यासाठी क्रेनला पाचारण करण्यात आले.

साकेगावच्या ग्रामस्थांच्या सहकार्याने नदीपात्रातील मृतदेह बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. रासपालसिंग राजवीरसिंगने दिलेल्या फिर्यादीवरून मृत चालकाविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक डी. के. शिरसाठ तपास करीत आहेत.