आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाचे ट्रक टर्मिनस चार वर्षांपासून अपूर्णावस्थेतच!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - महामार्गावरील वाहनांची वर्दळ आणि शहरात माल आणणा-या वाहनांची गर्दी टाळण्यासाठी तयार करण्यात येणारे ट्रक टर्मिनस गेल्या चार वर्षांपासून अपूर्णावस्थेत आहे. त्यामुळे शहरातील जड वाहनांची कोंडी कायम आहे. महापालिकेसाठी आर्थिक स्रोत ठरणा-या या टर्मिनसमध्ये 200 ट्रक उभे राहू शकतात. मात्र, संथगतीने होणा-या कामामुळे महापालिकेचाही महसूल बुडत आहे.

शहरातील मुख्य बाजारपेठ पाचकंदील परिसरात आहे. पूर्वीपासून ही बाजारपेठ असल्याने येथे घाऊक व किरकोळ मालाची विक्री करणा-या व्यापा-यांची दुकाने आणि गोडाऊन आहेत. याच मालाची गोदामेही परिसरात असल्याने येथे दररोज मालवाहतुकीची जड वाहने उभी असतात. एक ट्रक रिकामा करण्यासाठी साधारणपणे अर्धातास कालावधी लागतो. ट्रक टर्मिनस झाले तर यातील काही वाहने त्यात लावण्याची सुविधा मिळेल. त्यातून महापालिकेला दररोजचे उत्पन्नही मिळेल. त्यातच महामार्गावरून जाणा-या वाहनांसाठीही या टर्मिनसचा उपयोग होईल. मोहाडी उपनगरात ट्रक टर्मिनसची निर्मिती करण्यात येत आहे. गेल्या चार वर्षांपासून काम सुरू आहे. मात्र, ते रखडलेलेच आहे. या ठिकाणी जड वाहनांना उभे राहण्यासाठी मोठे आवार उपलब्ध करून देण्यात आले आहे. व्यापा-यांना व्यवहार करण्यासाठी कार्यालय आणि गोडाऊनसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे बाहेरगावाहून येणारे ट्रक सरळ महामार्गावरून येऊन येथे माल खाली करतील व पुढे महामार्गानेच निघून जातील. तर व्यापारी त्यांच्या सोयीनुसार हा माल लहान वाहनातून शहरात आणतील. अशा प्रकारे वाहनांची कोंडी शहरात टाळता येणार आहे.
04 हेक्टरवर ट्रक टर्मिनस
महापालिकेतर्फे मोहाडी उपनगरात दर्ग्याच्या मागील बाजूस हा ट्रकं टर्मिनस चार हेक्टर जागेवर होत आहे. या ठिकाणी ट्रकचालकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. स्वच्छतागृह तसेच ट्रकचालकांना राहण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
30 गाळे व्यापा-यांसाठी
या ट्रक टर्मिनसवर ट्रकचालक येऊन थांबतील. तेथेच त्यांचा माल उतरविण्यात येणार आहे. यासाठी गोडाऊनचीही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तर व्यापारीवर्गाला त्यांचे कार्यालय स्थापण्यासाठी 30 गाळे तयार करण्यात आले आहेत. अशा प्रकारे या ठिकाणीच सर्व व्यवहार होणार आहेत.

1.32 कोटीतून ट्रक टर्मिनस
शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी महापालिकेतर्फे हे ट्रक टर्मिनस उभारण्यात येत आहे. यासाठी एक कोटी 32 लाख रुपयेखर्च येणार आहे. हे काम ब-याच दिवसांपासून संथगतीने सुरू आहे. तसेच ते पूर्ण झाल्यावर खासगी ठेका पद्धतीने देण्याचे महापालिकेच्या विचाराधीन आहे.

200 ट्रकांची क्षमता
हे ट्रक टर्मिनस हे मुंबई-आग्रा महामार्गापासून काही अंतर आत आहे. त्यामुळे ट्रकचालकांना ते फायद्याचे ठरणार आहे. लांब जाणा-या ट्रकचालकांना त्यांचे ट्रक येथे पार्क करून आराम करण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध होणार आहे. येथे 200 ट्रक उभे राहण्याची क्षमता आहे.