आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिकवण्या घेणार्‍या गुरुजींवर वक्रदृष्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - शहरात दिवसेंदिवस खासगी शिकवण्यांचे फॅड वाढत आहे. खासगी शिकवणी वर्गात कायम अनुदानित अथवा शासकीय शाळेतील शिक्षक अध्यापन करतात काय, याचा शोध घेण्यासाठी शिक्षण विभागातर्फे शोधमोहीम हाती घेण्यात येणार आहे. तसे आदेश शिक्षणाधिकारी कार्यालयाला दिले जाणार आहेत.

काही वर्षांपूर्वी दहावी, बारावीचे विद्यार्थी अवघड विषयाच्या खासगी शिकवणीला जात असत. मात्र, सध्या पहिल्या वर्गापासूनच वेगवेगळया विषयांच्या खासगी शिकवण्या सुरू आहेत. सायन्स विषयाचा बाऊ करून वेगवेगळया विषयांसाठी वेगवेगळे शिक्षक खासगी शिकवण्या घेतात. काही शासकीय शाळेतील शिक्षक शाळा सुटल्यावर शिकवण्या घेतात. याबाबतच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणात वाढल्याने त्यावर आळा घालण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. यासाठी भरारी पथके तयार करण्यात येणार आहेत.

यापूर्वीही तत्कालीन शिक्षण संचालक र्शीधर साळुंखे यांनी तत्कालीन शिक्षणाधिकारी जी. के. पाडवी यांना भरारी पथकांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, शिक्षणाधिकारी कार्यालयाने त्याबाबत कोणतीच हालचाल केलेली नाही. तसेच खासगी कोचिंग क्लासेस महानगरपालिका क्षेत्रात सुरू झाल्यास त्यांची शॉप अँक्टनुसार नोंदणी होणे आवश्यक आहे. मात्र, तशी नोंदणी होत नाही. त्यामुळे खासगी कोचिंग क्लासेस नियंत्रणमुक्त आहेत. त्यांचे शुल्क व नियोजनदेखील नियंत्रणमुक्त असल्याने विद्यार्थी व पालकांची पिळवणूक होत आहे. त्यावर पर्याय म्हणून ही मोहीम हाती घेण्यात आली असल्याची माहिती शिक्षण विभागातर्फे देण्यात आली. दरम्यान, या निर्णयामुळे संबंधितांमध्ये खळबळ उडाल्याची स्थिती आहे.

शिकवणीवर्ग व्यवस्थापकांना निर्देश
तसेच खासगी शिकवणी घेत असलेल्या व्यवस्थापकाला शिकवणी वर्गाबाबतची नोंद उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण, माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागाच्या जिल्हा कार्यालयाकडे करावी लागणार आहे. त्यात व्यवस्थापकाचे नाव, शिकवणी वर्गाचे ठिकाण, वर्गाची वेळ, विषय, विद्यार्थ्यांची शाळानिहाय यादी आणि शिकवणी घेत असलेल्या शिक्षकांची माहिती, त्यांचे पासपोर्ट फोटो सादर करावे लागणार आहे. शालेय वेळात विद्यार्थी शिकवणी वर्गात जात असल्याचे निदर्शनास आल्यास अशा शाळांतील प्रत्यक्ष उपस्थित विद्यार्थ्यांची प्रशासनाकडून पडताळणी करण्यात येईल. या पडताळणीत दोषी आढळल्यास संबंधित प्राचार्य, मुख्याध्यापकाला जबाबदार धरून त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे.

अद्यापपर्यंत शासनाकडून आदेश प्राप्त झालेले नाहीत. मात्र, तसे आदेश असल्यास तत्काळ कारवाई करण्यात येईल. प्रत्येक शिक्षकाकडून रीतसर प्रतिज्ञापत्र भरून घेण्यात येते. तसेच कोणी पुराव्यानिशी तक्रार केली तर दोषी शिक्षकांवर कारवाई करण्यात येईल. डी. एल. साळुंखे, शिक्षणाधिकारी,माध्यमिक